बॉम्ब असल्याचा कॉल करणार्या तरुणाला उत्तरप्रदेशातून अटक
आंतरराष्ट्रीय विमानतळासह ताज हॉटेलमध्ये बॉम्ब अफवेचा कॉल केला होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ मे २०२४
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासह ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या कॉल करुन संपूर्ण पोलीस यंत्रणेला कामावर लावणार्या उत्तरप्रदेशातील एका तरुणाला अटक करण्यात अखेर वरळी पोलिसांना यश आले आहे. अरविंदकुमार सावलकुमार राजपूत असे या २९ असे या आरोपी तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशच्या आग्रा शहरातील रहिवाशी आहे. दारुच्या नशेत मित्राचा मोबाईल चोरी करुन त्याने बॉम्ब असल्याचा कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यांतील मोबाईलसह सिमकार्ड पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी उत्तरप्रदेशातून मुंबईत आणले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक कंट्रोल रुमला सोमवारी २७ मेला दुपारी एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. आंतरराष्ट्रीय विमानतळासह ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे. त्याचा कुठल्याही क्षणी स्फोट होईल, सतर्क रहा असे सांगून त्याने कॉल कट केला होता. ही माहिती नंतर कंट्रोल रुममधून वरिष्ठांना देण्यात आली होती. या कॉलची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह बॉम्बशोधक नाशक पथकासह श्वान पथकाला संपूर्ण परिसरात तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर स्थानिक पोलिसांनी श्वान पथकासह बॉम्बशोधक पथकासोबत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलची तपासणी सुरु केली होती. मात्र तिथे पोलिसांना कुठलीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस येताच संबंधित पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. या घटनेनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध वरळी पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक तपासात हा कॉल उत्तरप्रदेशातून आल्याचे उघडकीस आले आहे. कॉल केल्यानंतर संबंधित व्यक्तीने मोबाईल बंद ठेवला आहे. त्यानंतर वरळी पोलिसांचे एक विशेष पथक उत्तरप्रदेशला गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अरविंदकुमार राजपूत या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच बॉम्ब असल्याचा कॉल केल्याचे उघडकीस आले. तो उत्तरप्रदेशच्या आग्राचा रहिवाशी असून त्याने त्याच्या मित्राचा मोबाईल चोरी केला होता. दारुच्या नशेत त्याने मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करुन बॉम्ब ठेवल्याचा कॉल केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे. मुंबईत आणल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.