दाऊदच्या नावाने बॉम्बस्फोटाची धमकी देणार्या मद्यपीला अटक
यापूर्वीही धमकी दिल्याचे उघड; ताबा आझाद मैदान पोलिसांकडे
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी बोलत असून मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोटाची मालिका घडविण्याची धमकी मंगळवारी दुपारी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला प्राप्त होताच एकच खळबळ उडाली होती. मात्र धमकी देणार्या आरोपीला अवघ्या काही तासांत बोरिवली येथून पोलिसांनी अटक केली. सुरेश धर्मा जाधव असे या आरोपीचे नाव असून त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे कंट्रोल रुमला कॉल करुन बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध बोरिवली पोलिसांनी तडीपारची कारवाई केली होती. ही कारवाई संपल्यांनतर त्याने पुन्हा दाऊदच्या नावाने ही धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर सुरेश धर्माला आझाद मैदान पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितले.
मंगळवारी दुपारी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने तो दाऊद इब्राहिमचा सहकारी बोलत असून मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोटाची मालिका घडविणार असल्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने कॉल बंद केला होता. दाऊदच्या नावाने आलेल्या बॉम्बस्फोटाच्या या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. तपासादरम्यान हा कॉल बोरिवली येथून आला होता, या मोबाईलचे लोकेशन बोरिवली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना देण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या पथकाने बोरिवलीतील एक्सेल डोंगरी परिसरातून सुरज जाधव या 37 वर्षांच्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते.
तपासात त्यानेच कंट्रोल रुमला कॉल करुन ही धमकी दिल्याचे उघडकीस आले. सुरज हा एक्सेल डोंगरी परिसरात राहत असून बेरोजगार आहे. काहीच कामधंदा न करणार्या सुरजला दारु पिण्याचे व्यसन होते. दारुच्या नशेत त्याने दाऊदच्या नावाने ही धमकी दिली होती. 2023 साली त्याने अशाच प्रकारे तीन ते चार वेळा मुंबई शहरात आरडीएक्स आले असून लवकरच बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिली होती. याप्रकरणी काही गुन्हे दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. दारुच्या नशेत तो सतत कंट्रोल रुमला कॉल करुन बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देत होता. त्याच्या या धमकीच्या कॉलमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एक वर्षांची तडीपारची कारवाई करण्यात आली होती.
ही कारवाई अलीकडेच संपताच तो त्याच्या बोरिवलीतील राहत्या घरी आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा दारुच्या नशेत कंट्रोल रुमला कॉल करुन धमकी दिल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्याला पुढील चौकशीसाठी आझाद मैदान पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. बुधवारी त्याला किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.