उपनगरीय लोकलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देणारा गजाआड

यापूर्वीही बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑगस्ट 2025
मुंबई, – मुंबई शहराची लाईफलाईन समजल्या जाणार्‍या उपनगरीय लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडविणार असल्याची कॉल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला करुन संपूर्ण पोलीस दलाला कामाला लावणार्‍या आरोपीस काही तासांत आझाद मैदान पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सुरज धर्मा जाधव असे या 32 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सुरज हा दारुच्या आहारी गेला असून त्याने यापूर्वीही बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

गुरुवारी सायंकाळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने तो स्वतहून उपनगरीय लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडविणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने कॉल बंद केला होता. या मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी कॉल केला असता तो मोबाईल क्रमांक बंद येत होता. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यात उपनगरीय लोकलमध्ये आलेल्या बॉम्बस्फोटाच्या धमकीची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बॉम्बस्फोटाची धमकी देऊन दशहतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. ज्या मोबाईलवरुन हा कॉल आला होता, ती व्यक्ती सांताक्रुज परिसरात राहत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याच्या कॉल रेकॉर्डवरुन सुरज जाधव याला पोलिसांनी कालिना येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले.

सुरज हा सांताक्रुज येथील कालिना परिसरात राहत असून त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. गुरुवारी त्याने मद्यप्राशन केले होते. यावेळी त्याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल करुन तो स्वत उपनगरीय लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडविणार असल्याचे सांगून कॉल कट केला होता. सुरजने यापूर्वीही अशाच प्रकारे बॉम्बस्फोटाची धमकी देणारा कॉल मुंबई पोलिसांना केला होता. यावेळी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यात जामिनावर असताना त्याने पुन्हा बॉम्बस्फोट घडविणार असल्याचे कॉल केल्यानंतर त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करुन त्याच्याकडून बॉण्ड लिहून घेण्यात आला होता. त्याचे त्याने उल्लघंन केल्यास त्याच्याविरुद्ध आणखीन कठोर कारवाई केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

दरम्यान या धमकीनंतर स्थानिक पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरील बंदोबस्तात प्रचंड वाढ केली होती. लोकलची तपासणी करण्यात येत होती. रेल्वे स्थानकातील संशयित व्यक्तीसह त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली होती. त्यात रेल्वे पोलिसांना काहीही आक्षेपार्ह आणि संशयास्पद सापडले नव्हते. तरीही शहरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात बंदोबस्त वाढविण्याचे आदेश वरिष्ठांकडून रेल्वे पोलिसांना देण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page