मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 सप्टेंबर 2025
ठाणे, – कळवा रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी रुपेश मधुकर रणपिसे या 43 वर्षांच्या आरोपीस ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक केली. रुपेश हा दारुच्या आहारी गेला असून दारुच्या नशेतच त्याने नागपूर पोलीस कंट्रोल रुमला कॉल करुन बॉम्बस्फोट होणार असल्याचा कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक परते हे नागपूर येथील पोलीस कंट्रोल रुममध्ये कार्यरत असताना 31 ऑगस्टला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. कॉल करणार्या व्यक्तीने त्याचे नाव रुपेशकुमार असल्याचे सांगून तो कळवा रेल्वे स्थानकात उभा आहे. त्याने बॉम्ब घातला असून तिथे आणखीन एक बॉम्ब ठेवला आहे. या बॉम्बचा कुठल्याही क्षणी स्फोट होईल अशी धमकी दिली होती. कळवा रेल्वे स्थानकात बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक परते यांनी ही माहिती वाडीबंदर येथील पोलीस उपनिरीक्षक सावंत यांना ही माहिती दिली होती. ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकासह कळवा रेल्वे स्थानकात धाव घेतली होती.
संपूर्ण कळवा रेल्वे स्थानकाची तपासणी करण्यात आली, मात्र तिथे पोलिसांना काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस येताच ठाणे रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदराज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चिमनाजी केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोपाळ, सहाय्यक फौजदार भांडवले, पोलीस हवालदार सुधाकर आदमिले, पोलीस शिपाई वाघमोडे, पाटील, महिला पोलीस शिपाई गायकवाड यांनी तांत्रिक माहितीवरुन रुपेश रणपिसे या संशयिताला ताब्यात घेतले.
तपासात रुपेश हा डोबिंवलीच्या वक्रतुंड सोसायटीमध्ये राहत असून त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. घटनेच्या वेळेस त्याने मद्यप्राशन केले होते. याच अवस्थेत असताना त्याने नागपूर येथील पोलीस कंट्रोल रुमला कॉल केला होता. घाटकोपर बीडीडीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अढतराव, पोलीस उपनिरीक्षक सावकार, पोलीस हवालीदार जाधव, घोडके यांनी त्याच्या झडती घेतली होती, त्यात त्यांना काहीच सापडले नाही. त्याचा मोबाईलसह पिशवीत ठेवलेला लोखंडी हातोडा, सुरी आणि आधारकार्ड पोलिसांनी जप्त केले आहे. गणेशोत्सव सुरु असल्याने या धमकीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती, मात्र रुपेशने दारुच्या नशेत हा कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले होते.