मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2026
मुंबई, – मुंबईहून गाजियाबाद येथे जाणार्या विमानात बॉम्बच्या नावाने बोंबाबोंब करणार्या एका 58 वर्षांच्या महिलेस सहार पोलिसांनी अटक केली. शांती कोठारी असे या महिलेचे नाव असून ती साकिनाका येथे राहते. दिल्लीला जाण्यापूर्वी तिने अचानक गाजियाबाद विमानात बॉम्ब असल्याचा कांगावा केल्याने विमानतळावर उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चौकशीनंतर ताब्यात घेतल्यानंतर तिला सुरक्षारक्षकांनी सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. तिच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोहम्मद सोहेल शेख हे कुर्ला येथे राहत असून गेल्या पाच वर्षांपासून एका खाजगी एअरलाईन्स कंपनीत सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी पहाटे चार वाजता ते बोर्डिंग गेट क्रमांक 51, लेव्हल तीन येथे कर्तव्य बजावत होते. सकाळी आठ वाजता ते मुंबई-गाजियाबाद येथे जाणार्या विमानाविषयी सूचना आणि घोषणा देत होते. याच दरम्यान गेट क्रमांक 51 जवळ उभ्या असलेल्या शांती कोठारी हिने त्यांना उद्देशून इतक्या जोरजोरात घोषणा का देत आहेस. ज्यांना यायचे ते येतील, इथे काय मच्छिमार्केट बनविले आहेस का असे बोलून तिने बोर्डिंग करत असलेल्या प्रवाशांना गाजिझाबाद विमानात जाऊ नये. विमानात बॉम्ब ठेवला आहे असे ओरडू लागली.
या प्रकाराने तिथे उपस्थित प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. प्रवाशांमध्ये दशहतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती प्राप्त होताच विमानतळावरील सुरक्षारक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. विमानात बॉम्ब असल्याचे सांगणार्या शांती कोठारीला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत शांतीला मुंबईहून दिल्लीला जाणार्या विमानातून प्रवास करायचा होता. मात्र तिच्याच शेजारी गाजियाबादला जाणारे काही प्रवासी होते. विमानात बोर्डिंग करताना तिने गाजियाबाद विमानात जाणार्या प्रवाशांना विनाकारण विमानातून प्रवास करु नका, त्यात बॉम्ब असल्याचे बोंबाबोंब केली होती.
त्यामुळे तिला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. शांती कोठारी ही साकिनाका येथील चांदीवली, अमृत शक्ती, युक्ता नहार परिसरात राहते. याप्रकरणी मोहम्मद सोहेल शेख यांच्या तक्रारीवरुन तिच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. दरम्यान बॉम्बच्या बोंबाबोंबमुळे उड्डान करण्यापूर्वी सुरक्षारक्षकांनी गाजियाबादला जाणार्या विमानाची कसून तपासणी केली होती. त्यात या अधिकार्यांना काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. त्यानंतर या विमानाला उड्डानाची परवानगी देण्यात आली होती.