न्यूयॉर्कसह तीन विमानात बॉम्बची धमकीचा ट्विट

अल्पवयीन मुलासह दोन संशयितांची चौकशी सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण करणार्‍या तीन विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या ट्विट पाठवून तपास यंत्रणेला कामाला लावणार्‍या एका अल्पवयीन मुलासह दोन संशशितांना सहार पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलाला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर दुसर्‍या व्यक्तीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहै. या दोघांनीच धमकीचा ट्विट पाठविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मात्र धमकी देण्यामागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही.

रविवारी मध्यरात्री तीन वाजता नवी मुंबई ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईन ट्विटरवर एक मॅसेज आला होता. त्यात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन न्यूयॉर्कसह इतर ठिकाणी जाणार्‍या तीन विमानात बॉम्ब ठेवला आहे असे नमूद करण्यात आले होते. ही माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून प्राप्त होताच पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांच्यासह स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, एटीएस आणि बॉम्बशोधक व नाशक पथकातील अधिकारी आणि कर्मचारी तिथे दाखल झाले होते. या पथकाने श्‍वान पथकाच्या मदतीने सर्व विमानाची तपासणी सुरु केली होती. या तपासणीदरम्यान पोलिसांना कुठलीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नव्हती. बॉम्बचा ट्विट येण्यापूर्वी विमानतळावरुन न्यूयॉर्कला एअर इंडियाचे एक विमानाने उड्डान केले होते. त्यामुळे या विमानाच्या वैमानिकाला ही माहिती देऊन दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लॅण्ड करण्यास सांगण्यात आले. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते विमान लॅण्ड होताच सर्व प्रवाशांना खाली करुन तपासणी करण्यात ाअली. मात्र या विमानातही काहीही आक्षेपार्ह सापडले नाही.

सर्व विमानाची तपासणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे एक टिम राज नांदवाला गेले होते. या पथकाने गुडाखू लेन परिसरातून दोघांना ताब्यात घेतले होते. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. या गुन्ह्यांत दोघांचा सहभाग उघडकीस येताच त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्यापैकी अल्पवयीन मुलाला डोंगरीतील बालन्यायालयात हजर करण्यात आले तर दुसर्‍याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page