गोवंडी-कांदिवलीतील शाळेत बॉम्बच्या मेलने तणाव

तपासणीनंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 जून 2025
मुंबई, – गोवंडीतील कनकिया इंटरनॅशनल आणि कांदिवलीतील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा एक मेल प्राप्त झाल्याने शाळेतील शिक्षकासह पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. या धमकीनतर स्थानिक पोलिसांनी दोन्ही शाळांच्या इमारतीची तपासणी केली होती, मात्र तपासणीनंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी देवनार आणि समतानगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स, 90 फिट रोडसमोरच रायन इंटरनॅशनल नावाची एक स्कूल आहे. शनिवारी आणि रविवारी स्कूलला एका अज्ञात व्यक्तीने मेल पाठविला होता. या मेलमध्ये या व्यक्तीने शाळेत बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती. यावेळी या व्यक्तीने स्वतची ओळख लपविण्याचा प्रयत्न केला होता. या मेलनंतर स्कूल प्रशासनाने ही माहिती समतानगर पोलिसांना दिली होती. या माहितीचे गांभीय लक्षात येताच स्थानिक पोलिसांसह बॉम्ब स्कॉडने श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. शाळेच्या इमारतीची संपूर्ण तपासणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी संतोष सावंत यांच्या तक्रारीवरुन समतानगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बॉम्बस्फोटाची धमकी देऊन भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

ही घटना ताजी असताना गोवंडीतील घाटकोपर-मानखुर्द लिंकवर असलेलया कनकिया इंटरनॅशनल शाळेत अशाच प्रकारे एक मेल प्राप्त झाला होता. या धमकीच्या मेलनंतर देवनार पोलिसांसह बॉम्ब स्कॉड आणि श्वान पथकाने संपूर्ण इमारतीची पाहणी केली होती, मात्र तपासणीनंतर तिथे काहीही आक्षेपाह्र वस्तू सापडली नव्हती. बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी मनोहर जयवंत नाईक यांच्या तक्रारीवरुन देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही धमक्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. हा मेल कोणी आणि कोठून पाठविला याचा सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या बॉम्बस्फोटाच्या धमकीने मुंबई पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यामुळे अशा आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेशच वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page