मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 सप्टेंबर 2025
मुंबई, – नोटा बदलण्याचा बहाणा करुन बोरिवली रेल्वे स्थानकात आलेल्या एका व्यक्तीकडील साडेचार लाखांची कॅश पळविणार्या मुख्य आरोपीस बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. यशवंत ऊर्फ ओमकार आश्विन मंचेकर असे या आरोपीचे नाव असून रॉबरीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत इतर तिघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गणेश सुभाषचंद्र सिसोदिया हे भाईंदरचे रहिवाशी असून त्यांचा करन्सी एक्सचेंजचा व्यवसाय आहे. ग्राहकांकडून आलेल्या फाटलेल्या जुन्या नोटा, चलनात बंद झालेल्या रिझर्व्ह बँकेला देऊन त्याऐवजी दुसर्या नोटा घेऊन ग्राहकांना देण्याचे काम आहे. या कामासाठी ते ग्राहकांकडून दहा ते पंधरा टक्के कमिशन घेतात. या कामात त्यांचे काही परिचित एजंट असून त्यांच्याकडूनही त्यांना अनेकदा काम मिळते. त्यासाठी ते संबंधित एजंटला काही कमिशन देतात. 8 सप्टेंबरला त्यांच्या परिचित मनोज नावाच्या एका एजंटने त्यांना कॉल करुन ओमकार मंचेकर या व्यक्तीकडे दोन हजार रुपयांच्या सात लाखांच्या साडेतीनशे नोटा आहे. त्या नोटा बदलून हव्या आहेत असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला पंधरा टक्के कमिशन घेऊन उर्वरित नवीन नोटा देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी त्याने त्यांना बोरिवलीतील गोरा गांधी हॉटेल येथे भेटण्यास बोलाविले होते.
9 सप्टेंबरला सकाळी ते मनोजसोबत गोरा गांधी हॉटेलजवळ आले होते. यावेळी त्यांनी ओमकारला कॉल केला, मात्र तो त्याचे आजोबा हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगून आला नाही. त्यानंतर त्यांनी 11 सप्टेंबरला भेटण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे गणेश सिसोदिया हे बोरिवलीतील फलाट क्रमांक एकवर आले होते. यावेळी त्यांनी ओमकारला देण्यासाठी सहा लाख रुपये आणले होते. त्यापैकी साडेचार लाख एका बॅगेत तर दुसर्या बॅगेत दिड लाख ठेवले होते. फलाट एकवर ते ओमकारची वाट पाहत होते. सायंकाळी चार वाजता तिथे ओमकार आला. याच दरम्यान तिथे काही तरुण आले. त्यांनी त्यांच्याकडे पाहून इशारा केला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच गणेश सिसोदिया हे पळू लागले.
ते लोकलमध्ये चढले असता त्यांच्या मागून ते तिघेही आले आणि त्यांनी त्यांच्याकडील एक बॅग घेऊन पलायन केले. या बॅगेत साडेचार लाखांची कॅश होती. दिड लाखांची कॅश सोडून ते चौघेही साडेचार लाखांची कॅश घेऊन पळून गेले होते. या घटनेनंतर ओमकार मंचेकर हादेखील पळून गेला होता. त्यानेच इतर सहकार्याच्या मदतीने ही लुटमार केल्याचा संशय व्यक्त करुन गणेश सिसोदिया यांनी बोरिवली रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी ओमकारसह इतर तिघांविरुद्ध रॉबरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या यशवंत ऊर्फ ओमकार मंचेकर याला अटक केली. चौकशीत त्यानेच त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने ही लुटमार केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला दुसर्या दिवशी पोलिसांनी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या इतर तीन सहकार्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.