कारची डिव्हायडरला धडक लागून 66 वर्षांच्या वयोवृद्धेचा मृत्यू
खाजगी कंपनीच्या कारचालकाविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 डिसेंबर 2025
मुंबई, – भरवेगात कार चालविण्याचा प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने डिव्हायडरला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात जेसिंथा पीटर डिसोझा या 66 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बोरिवली परिसरात घडली. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी खाजगी कंपनीच्या कारचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात रविवारी सकाळी नऊ वाजता बोरिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळील मागाठाणे मेट्रो स्टेशन, आशियाना हॉटेलसमोर झाला. एडवर्ड प्रियांक डिसोझा हे वडाळा परिसरात राहत असून एका शिपिंग कंपनीत कामाला आहे. जेसिंथा ही त्यांची आई असून त्यांची आई त्यांच्या वडिलांसोबत वसईतील बर्हमपूर, श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स परिसरात राहत होती. रविवारी त्याने त्याच्या आईला फोन करुन घरी बोलाविले होते. त्यासाठी त्याने त्याच्या आईसाठी ऑनलाईन कार बुक केली होती. सकाळी साडेसात वाजता ही कार त्यांच्या वसईतील घरी आली होती. त्यानंतर त्याची आई जेसिंथा ही कारमधून वडाळ्याच्या दिशेने निघाली होती.
सकाळी नऊ वाजता ही कार वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळून जात होती. यावेळी भरवेगात कार चालविण्याच्या प्रयत्नात कारचालकाचा कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने कारला डिव्हायडरला जोरात धडक दिली होती. या अपघातात जेसिंथा डिसोझा ही गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला समतानगर येथील साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. तिथेच तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता तिचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी एडवर्ड डिसोझा याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी खाजगी कंपनीच्या कारचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून त्याच्या वयोवृद्ध आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी कारचालकावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.