मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मार्च २०२४
मुंबई, – रस्त्यावरुन जाणार्या एका अज्ञात व्यक्तीचा बेस्ट बसच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री बोरिवली परिसरात घडली. मृत व्यक्तीची ओळख पटली नसल्याने त्याची ओळख पटावी यासाठी आता पोलिसांनी प्रयत्न सुरु केला आहे. अपघातप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी हलगर्जीपणा गुन्हा नोंदवून आरोपी बसचालक प्रभाकर विष्णू कळंबे याला अटक केली. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात शनिवारी रात्री सव्वादहा वाजता बोरिवलीतील कार्टर रोड क्रमांंक एक, सिद्धीविनायक नर्सिंग होमसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी रात्री कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यातील निर्भया पथकातील अधिकारी आणि कर्मचारी परिसरात गस्त घालत होते. या दरम्यान सिद्धीविनायक नर्सिंग होमजवळ अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख पटेल अशी कुठलीही वस्तू सापडली नाही. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. स्थानिक लोकांनी पादचार्याला धडक देणार्या बेस्ट चालकास ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याचे नाव प्रभाकर कळंबे असल्याचे उघडकीस आले. तो मालाडच्या कुरारगाव, पिंपरीपाडा, माऊली राणी चाळीत राहतो. हलगर्जीपणाने बस चालवून एका पादचार्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रभाकर कळंबे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.