मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ जून २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका बेस्ट बसच्या धडकेने युवा मनिष चंद्र या चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला तर तिचे वयोवृद्ध आजोबा गंभीररीत्या जखमी झाले. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी बसचालक सागर तुलसीदास कोळी याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.
हा अपघात मंगळवारी २५ जूनला सकाळी सव्वाआठ वाजता बोरिवलीतील शिंपोली रोड, इटोपिया टॉवर इमारतीसमोर झाला. ६९ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार नवलकिशोरप्रसाद अंबिकाप्रसाद सिंह हे बोरिवलीतील एसबीआय स्टाफ वसाहतीच्या कांतीपार्क परिसरात राहत असून मृत युवा ही त्यांची नात आहे. मंगळवारी सकाळी ते युवासोबत त्यांच्या बाईकवरुन बोरिवलीच्या दिशेने जात होते. ही बाईक इटोपिया टॉवरजवळ येताच भरवेगात जाणार्या एका बेस्ट बसने त्यांच्या बाईकला धडक दिली होती. या अपघातात नवलकिशोरप्रसाद सिंह व त्यांची नात युवा हे दोघेही जखमी झाले होते. नवलकिशोरप्रसाद यांच्या चेहरा, हाताला आणि पायाला तर युवाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे या दोघांनाही तातडीने न्यू प्लस चाईल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे युवाला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर नवलकिशोरप्रसाद यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. अपघाताची माहिती मिळताच बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी नवलकिशोर सिंह यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी बसचालक सागर तुलसीदास कोळी हलगर्जीपणाने बस चालवून एका चार वर्षांच्या मुलीच्या मृत्यूस तर त्यांना गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सागर कोळी याला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.