मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जून २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या बसच्या धडकेने एका २९ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. दिपक संजय भंडारी असे या मृत तरुणाचे नाव असून तो बोरिवलीतील रहिवाशी आहे. अपघातानंतर बसचालकाने घटनास्थळाहून पलायन केले. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी हलगर्जीपणाने बस चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या बसचालकाचा शोध सुरु केला आहे.
हा अपघात बुधवारी २६ जूनला सायंकाळी सव्वासात वाजता बोरिवलीतील एसव्हीपी रोड, सुधीर फडके ब्रिजजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. भाऊदास जेजीराम गांगुर्डे हे बोरिवली पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहे. बुधवारी ते रात्रपाळीवर कर्तव्यावर हजर झाले होते. रात्री आठ वाजता मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून पोलिसांना सुधीर फडके ब्रिजजवळ अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिथे गेलेल्या पोलिसांना एका अज्ञात वाहनाच्या धडकेने एक तरुण गंभीररीत्या जखमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला पोलिसांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यातच जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. तिथे उपचार सुरु असताना रात्री सव्वादहा वाजता या तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्याकडे मिळालेल्या कागदपत्रावरुन त्याची ओळख पटली होती. त्याचे नाव दिपक भंडारी (२९) असून तो बोरिवलीतील लक्ष्मण म्हात्रे रोड, शिवाजीनगर, सुन्नी मशिदीजवळील खड्डा एरिया परिसरात राहत होता.
प्राथमिक तपासात तो सायंकाळी सव्वासात वाजता सुधीर फडके ब्रिजसमोरुन जात होता. यावेळी भरवेगात जाणार्या एका बसने त्याला धडक दिली होती. बसचा चाक डोक्यावरुन गेल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता, त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भाऊदास गांगुर्डे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अपघातानंतर बसचालकाने जखमी तरुणाला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती न देता पलायन केले होते. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.