मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जानेवारी २०२५
मुंबई, – ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात एका बेस्ट बसची धडक लागून २५ वर्षांच्या बाईकस्वार तरुणाचा मृत्यू झाला. वैभव विजय कांबळे असे या मृत तरुणाचे नाव असून त्याच्या मृत्यूप्रकरणी संदेश श्रीकांत सुतार या बसचालकाविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितले. हलगर्जीपणाने बस चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा अपघात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता बोरिवलीतील बोरिवलीतील गोराई रोड, आकाशवाणीसमोर झाला. ६० वर्षांचे विजय विठ्ठल कांबळे हे बोरिवलीतील एमएचबी कॉलनी, नंदनवन सोसायटीमध्ये राहतात. सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे त्यांच्या साकिनाका येथील कामावर निघून गेले होते. काही वेळानंतर त्यांचा मुलगा वैभव हादेखील त्याच्या बाईकवरुन कामावर जाण्यासाठी निघाला होता. ही बाईक गोराई रोड, आकाशवाणीसमोर येताच एका बेस्टचालकाने त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात त्याने बाईकला मागून धडक दिली होती. त्यात वैभव हा खाली पडला आणि त्याच्या डोक्याला, कपाळाला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या वैभवला पोलिसांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी बेस्ट चालक संदेश सुतार याच्याविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने बस चालवून एका बाईकस्वार तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याला नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले. वैभव हा विजय कांबळे यांचा एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे त्याच्या अपघाती निधनाने कांबळे कुटुंबियांवर प्रचंड शोककळा पसरली आहे.