मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – भरवेगात कार चालविणे एका कारचालकाच्या जिवावर बेतल्याची घटना सोमवारी पहाटे बोरिवली परिसरात घडली. कार सुसाट वेगाने पळविण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले आणि कारचालकाने डिवायडरला जोरात धडक दिली. या अपघातात अमीत सुरेश अग्रवाल या ४७ वर्षांच्या कारचालकाचा मृत्यू झाला. हलगर्जीपणाने कार चालवून स्वतच्याच मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमीत अग्रवाल याच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
हा अपघात सोमवारी सकाळी पहाटे पाच वाजता बोरिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मागाठाणे ब्रिजवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अमीत हा त्याच्या सियाझ कारमधून दहिसर येथून बोरिवलीच्या दिशेने येत होता. पहाटे पाच वाजता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला फारशी वर्दळ नसल्याने त्याने कार भरवेगात चालविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने आधी डिवायडर आणि नंतर एका खाजगी बसला जोरात धडक दिली होती. या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
जखमी झालेल्या कारचालकाला नंतर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तपासात मृत कारचालकाचे नाव अमीत अग्रवाल असल्याचे उघडकीस आले. तो बोरिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, वसंत मार्बल कॉम्प्लेक्स, ग्रॉंड्यअर टॉवर अपार्टमेंटमध्ये राहत होता. अपघाताची माहिती नंतर त्याचे वडिल सुरेश अग्रवाल यांना देण्यात आली होती. अपघाताची माहिती दिल्यानंतर त्यांचीही पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.