मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 एपिल 2025
मुंबई, – बहिणीशी बोलतो म्हणून तरुणावर हल्ला करण्यासाठी गेलेल्या आरोपीच्या हल्ल्यात 50 वर्षांची जखमी झाल्याची घटना बोरिवली परिसरात घडली. सुनिता सुभाष साळवे असे या जखमी महिलेचे नाव असून तिच्यावर नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन विनोद राजेंद्र मस्के या 28 वर्षांच्या आरोपी तरुणाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना बुधवारी रात्री सव्वाच्या सुमारास बोरिवलीतील गोराई, गल्ली क्रमांक चार, दुर्गा माता मंदिराजवळील भीमनगरात घडली. याच परिसरात सुनिता ही राहत असून घरकाम करते. आरोपी विनोद मस्के हा तिच्याच शेजारी राहत असून त्याच्या लहान बहिणी आणि सुनिताचा मुलगा राजेश हे दोघेही चांगले मित्र आहेत. शेजारीच राहत असल्याने ते नेहमीच एकमेकांशी बोलत होते. राजेश त्याच्या बहिणीशी बोलत असल्याने विनोदला त्याचा प्रचंड राग होता. त्यातून तो त्याला नेहमीच शिवीगाळ करत होता. तिच्या घराच्या दरवाज्याला लाथा मारुन त्यांना मानसिक त्रास देत होता. तसेच त्याने राजेशला जिवंत सोडणार नाही अशी धमकीच दिली होती. बुधवारी रात्री उशिरा याच कारणावरुन त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादातून विनोद हा राजेशला मारण्यासाठी हातात चाकू घेऊन आला होता. त्याच्या पोटात चाकू घुसविण्याचा प्रयत्न करताना तिथे त्याची आई सुनिता आली.
राजेशला वाचविताना चाकू हल्ल्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला तातडीने नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही माहिती मिळताच बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सुनिताची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून तिच्या जबानीनंतर आरोपी विनोद मस्केविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मुलीशी बोलतो म्हणून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितल.