पूर्ववैमस्नातून 24 वर्षांच्या तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला
हत्येच्या प्रयत्नाचा गुन्ह्यांत दोन बंधूंना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2025
मुंबई, – पूर्ववैमस्नातून शादाब शब्बीर अहमद मेकरानी या 24 वर्षांच्या तरुणावर तीनजणांच्या टोळीने लाथ्याबुक्यांनी आणि नंतर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बोरिवली परिसरात घडली. या हल्ल्यात शादाब हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध एमएचबी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन दोन आरोपी बंधूंना अटक केली आहे. मुरारी रामजतन चौधरी आणि त्रिपुरारी रामजतन चौधरी ऊर्फ भुल्ला अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत रोशन हरिराम चौधरी या पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून पळून गेलेल्या रोशनचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता बोरिवलीतील लिंक रोड, गणपत पाटील नगर, गल्ली क्रमांक चारमध्ये घडली. याच परिसरात चौधरी बंधू राहत असून त्यांच्याच शेजारी शादाब हा राहत होता. त्यामुळे ते एकमेकांच्या परिचित होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. त्याचा चौधरी बंधूंना राग होता. त्यातूनच त्यांनी शादाबला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी दुपारी शादाब हा त्याच्या घराजवळ होता. यावेळी तिथे त्रिपुरारी, मुरारी आणि रोशन आले. या तिघांनी जुना वाद पुन्हा काढून त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान त्रिपुरारीने त्याच्याकडून चाकूने शादाबवर चाकूने वार केले होते.
एकीकडे त्याच्याकडून चाकूने वार सुरु असताना दुसरीकडे मुरारी आणि रोशनने त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. यावेळी त्याच्या मदतीला काही स्थानिक रहिवाशांनी धाव घेतली असता या तिघांनी त्यांनाही जिवे माण्याची धमकी दिली होती. या हल्ल्यात शादाबच्या गळ्याला, छातीला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी शादाबची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत त्याने घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मुरारी, त्रिपुरारी आणि रोशन या तिघांविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या चौधरी बंधूंना नंतर पोलिसांनी अटक केली तर रोशन हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर दोन्ही आरोपींना शनिवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.