मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जुलै 2025
मुंबई, – बोगस बिलासह इतर दस्तावेज सादर करुन डिलीव्हरी न केलेल्या मालाचे सुमारे पावणेदोन कोटीचे पेमेंट घेऊन एका खाजगी कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह दोघांना बोरिवली पोलिसांनी अटक केली. रामलल्लू रामभिलक तिवारी (65) आणि भरत पुरुषोत्तम प्रजापती (42) अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. याच गुन्ह्यांत अशोक सरुपचंद्र जैन, अभिषेक रामलल्लू तिवारी व इतरांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यातील अशोक जैन हा तक्रारदार व्यावसायिक महिलेचा नातेवाईक असून त्यानेच कट रचून हा आर्थिक घोटाळा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
55 वर्षांची तक्रारदार प्रतिभा तेजपाल शाह ही व्यावसायिक महिला बोरिवली परिसरात राहत असून तिची लिटेंक इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी खडी, रेती, बिटुमीनचे मिक्सचर विकण्याचा व्यवसाय करते. कंपनीचे बोरिवलीसह वसई परिसरात कार्यालय आहे. अशोक जैन हा तिचा नातेवाईक असून त्यानेच तिची अभिषेक आणि रामलल्लू यांच्याशी ओळख करुन दिली होती. ते दोघेही कोराऑन कन्स्ट्रक्शन आणि सहयोग इंटरप्रायजेस कंपनीचे मालक-संचालक आहे. त्यांचा सॅण्डक्रस्ट सप्लाय करण्याचा व्यवसाय असल्याचे सांगितले होते. तिच्या कंपनीला काही माल हवा असल्याने त्यांच्याकडून घेण्याचा सल्ला अशोक जैनने तिला दिला होता. त्याने तिने तिच्या कंपनीचे संचालक कैलास दवे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यास सांगितले होते.
या भेटीनंतर या दोघांनी कैलास दवे इतर कंपनीच्या तुलनेत तंना स्वस्तात सॅण्डक्रस्टची डिलीव्हरी करण्याचे आश्वासन दिले होते. 16 मे 2025 रोजी अशोक जैन हे प्रतिभा शाह यांच्याकडे आले होते. त्याने तिला अभिषेकने त्यांच्या कंपनीला 74 लाख 60 हजार 870 तर रामलल्लूने 98 लाख 50 हजार 771 असा 1 कोटी 73 लाख रुपयांचा मालाची डिलीव्हरी केली आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे पेमेंट करण्याची विनंती केली होती. तिचा विश्वास बसावा म्हणून त्याने तिला माल डिलीव्हरी केल्याचे काही बिल आणि दस्तावेज दाखविले होते. अशोक जैनवर विश्वास ठेवून तिने दोन्ही कंपनीच्या संचालकांना सुमारे पावणेदोन कोटीचे पेमेंट केले होते. यावेळी कैलास दवे हे कामानिमित्त उदयपूरला गेल्याने त्यांना या बिलाची पडताळणी करता आली नाही.
मात्र उदयपूरहून कैलास दवे हे मुंबईत आल्यानंतर त्यांना संबंधित मालाचे बिल आणि इतर दस्तावेज देण्यात आले होते. त्याची पडताळणी केल्यांनतर अशोक जैन यांनी दिलेले सर्व बिल आणि दस्तावेज बोगस असल्याचे उघडकीस आले. रामलल्लू आणि अभिषेक यांच्या कंपनीने त्यांच्या कंपनीला कोणत्याही मालाची डिलीव्हरी झाली नव्हती. तरीही मालाची डिलीव्हरी झाल्याचे बोगस बिल आणि इतर दस्तावेज सादर करुन अशोक जैन यांनी दोन्ही आरोपींच्या कंपनीच्या बँक खात्यात सुमारे पावणेदोन कोटीचे पेमेंट ट्रॉन्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. हा प्रकार लक्षात येता प्रतिभा शाह यांनी बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर कोराऑन कन्स्ट्रक्शन आणि सहयोग इंटरप्रायझेस कंपनीचे संचालक अशोक सरुपचंद जैन, अभिषेक रामलल्लू तिवारी, रामलल्लू रामभिलक तिवारी यांच्यासह इतर आरोपीविरुद्ध बोरिवली पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून सुमारे पावणेदोन कोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना रामलल्लू तिवारी आणि भरत प्रजापती या दोघांनाही सोमवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी या दोघांनाही कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.