युनिव्हरसिटीमध्ये प्रवेशासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार
फसवणुकीच्या गुन्ह्यांत पतीला अटक तर पत्नीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मार्च 2025
मुंबई, – ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी युनिव्हरसिटी या कॉलेजमध्ये प्रवेशासह इतर कामासाठी घेतलेल्या साडेतेरा लाखांचा अपहार करुन एका डॉक्टरची फसवणुक केल्याप्रकरणी आश्विन गणेशकुमार सोलंकी या 42 वर्षांच्या आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत त्याची पत्नी निधी व्यास ही सहआरोपी असून तिचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. अटकेनंतर आश्विन सोलंकीला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्यवसायाने डॉक्टर असलेले चिराग भरत शहा हे त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवली परिसरात राहतात. त्यांचा तिथे मिनू क्लिनिकल लेबॉरेटरी नावाचे एक पॅथोलॉजी लॅब आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची त्यांच्या परिचित भटजी कमलेश व्यास यांची मुलगी निधी व्यास व तिचा पती आश्विन सोलंकी यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. ते दोघेही बोरिवलीतील शिंपोली रोड, सत्याईनगर, सत्यसाईकृपा अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांना त्यांच्या मुलीला ऑस्ट्रेलियाला पुढील शिक्षणासाठी पाठवायचे होते. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांना वेस्टर्न सिडनी युनिव्हरसिटीमधून तिला ऑफर लेटर आले होते. ही माहिती त्यांनी निधी आणि आश्विनला सांगितली होती. तसेच तिला विदेशात जाण्यासाठी मदत करण्याची विनंती केली होती. त्यामुळे या दोघांनी तिच्या प्रवेशापासून इतर कामासाठी मदत करण्याचे आश्वासन देत कॉलेजचे अॅडमिशन, तिच्या राहण्याची, व्हिसा आणि विमाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून 28 लाख 38 हजार रुपये घेतले होते.
29 ऑगस्ट ते 23 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. काही दिवसांनी त्यांनी वेस्टर्न सिडनी युनिव्हरसिटीला संपर्क साधून प्रवेशाबाबत चौकशी केली होती. यावेळी त्यांना त्यांच्या मुलीच्या प्रवेशाची फी मिळाली नाही, त्यामुळे तिचे अॅडमिशन रद्द झाल्याचे सांगितले. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी निधी आणि आश्विनकडे चौकशी केली असता त्यांची फसवणुक केली नसल्याचा दावा केला. विविध कारण सांगून त्यांनी ही रक्कम जमा केल्याचे सांगितले. अॅडमिशन रद्द झाले तरी तिला पुन्हा युनिव्हरसिटीमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यांनी त्यांचे आश्वासन पाळले नाही. त्यानंतर त्यांनी अॅडमिशनसह इतर कामासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी या दोघांनी त्यांना 14 लाख 80 हजार रुपये परत केले. उर्वरित तेरा लाखांचा एक धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता.
वारंवार मागणी करुन त्यांनी उर्वरित 13 लाख 58 हजार रुपये केले नाही. नंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. त्यामुळे त्यांच्याशी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून निधी आणि आश्विन यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आश्विनकुमार सोलंकीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याची पत्नी निधी व्यास हिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे.