बोरिवलीतील खाजगी कंपनीत ४३ लाखांचा आर्थिक घोटाळा
कंपनीच्या सपोर्ट टिम लीडरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० डिसेंबर २०२४
मुंबई, – बोरिवलीतील खाजगी कंपनीत सपोर्ट टिम लीडर असलेल्या एका अधिकार्यानेच सुमारे ४३ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मनिष भीमराव राठोड या २७ वर्षांच्या सपोर्ट टिम लीडरविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आर्थिक व्यवहाराची माहिती घेताना आयटी प्रमुखांना हा प्रकार निदर्शनास आला आणि त्यानंतर कंपनीत मनिष राठोडनेच घोटाळा केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मनिष नाथुलाल गर्ग हे कांदिवलीतील चारकोप परिसरात त्यांच्या कुटुंबियासोबत राहतात. बोरिवलीतील मनीलिशियस सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ते सध्या प्रमुख अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनीत शेअरमार्केटमध्ये स्टॉक ब्रोकिंगचे काम करते. त्यांच्या कंपनीशी संबंधित ग्राहकांना कंपनीने धन नावाचे एक ऍप माध्यम उपलब्ध करुन दिले होते. या ऍपच्या माध्यमातून ग्राहकाकडून शेअरमार्केटमध्ये काही व्यवहार झाल्यास त्याचे कमिशन थेट कंपनीला मिळते. अनेक ग्राहक एजंटच्या माध्यमातून गुंतवणुक करत असल्याने कंपनी संबंधित एजंटला वीस टक्के कमिशन देते. याच कंपनी मनिष राठोड हा गेल्या एक वर्षांपासून कस्टमर सपोर्ट टिम लिडर म्हणून काम करतो. कंपनीच्या ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाचे काम संबंधित कस्टमर सपोर्ट टिमकडे असते. ग्राहकांच्या विनंतीवरुन त्यांना एखाद्या एजंटखाली मॅपिंग केले. त्यापूर्वी ग्राहकांना कंपनीला मेलद्वारे विनंती अर्ज करावे लागते. या विनंती अर्जानंतर कंपनीने त्यांच्या ग्राहकांना मॅपिंग करु शकतात.
१८ ऑक्टोंबरला कंपनीचे आयटी प्रमुख आलोक पांडे यांना कंपनीच्या व्यवहाराची माहिती घेताना कंपनीच्या एका एजंटचा १३ सप्टेंबर २०२४ रोजीचा कोड ओपन झाल्याचे दिसून आले. या एजंटने एका ग्राहकांचे मॅपिंग केले होते. त्यानंतर ग्राहकाने शेअरमध्ये केलेल्या व्यवहाराचे कमिशन त्याच्या बँक खात्यात जमा झाल्याचे दिसनू आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी इतर एजंटची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना एकूण बारा एजंटसह मनिष राठोडने स्वतच्या पोर्टफोलिओखाली कंपनीच्या अनेक ग्राहकांशी विनंती अर्ज न करता परस्पर मॅपिंग करुन कंपनीच्या ४३ लाख ५० हजार रुपयांचा अपहार करुन फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने मनिषची चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्याने कमिशन मिळविण्याच्या उद्देशाने कंपनीसह ग्राहकांची कोणतीही परवानगी न घेता कंपनीच्या पूर्वीच्या ग्राहकांचे अधिकृत विनंती मेलशिवाय परस्पर ठराविक एजंटच्या आयडीमध्ये प्रवेश काही ग्राहकांचे मॅपिंग केले. त्याचे कमिशन एजंटमार्फत स्वतच्या बँक ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीच्या वतीने मनिष गर्ग यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मनिष राठोडविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.