सोन्याचे विक्रीच्या बहाण्याने ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक
पतपेढीच्या संचालकासह दोघांविरुद्ध गुन्हा तर एकाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 जुलै 2025
मुंबई, – गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने सोडवून त्या दागिन्यांची विक्री करायची आहे असे सांगून एका ज्वेलर्स व्यापार्याकडून दागिने सोडविण्यासाठी घेतलेल्या 31 लाख 50 हजार रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्रीकांत शंकर चिट्टपिल्लई आणि भेरुदास बलुदास वैष्णव अशी या दोघांची नावे असून यातील श्रीकांत एका खाजगी पतपेढीचा संचालक आहे. अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच भेरुदास वैष्णवला पोलिसांनी अटक केली तर श्रीकांतचा पोलीस शोध घेत आहेत. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
अर्जुन बोथमल सिंघवी हे बोरिवली परिसरात राहत असून ते ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचे बोरिवली परिसरात महावीर ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. 30 जूनला त्यांना भेरुदास वैष्णव याचा फोन आला होता. त्याने एका पतपेढीत त्याचे 530 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गहाण ठेवल्याचे सांगून त्यांना व्हॉटअप दागिने गहाण ठेवल्याचे दस्तावेज पाठविले होते. ते दागिने सोडविण्यासाठी मदत करण्याची विनंती करुन त्याने नंतर त्या दागिन्यांची तुम्हाला विक्री करतो असे सांगितले होते. त्यासाठी त्याने त्यांच्याकडे 31 लाख 48 हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम पतपेढीत जमा करुन दागिने सोडवून त्यांना विक्री करुन उर्वरित रक्कम त्याला देण्याची विनंती केली होती. त्यासाठी त्याने त्यांना त्याच्या बँक खात्याची डिटेल्स पाठविली होती.
2 जुलैला अर्जुन सिंघवी यांचे सहकारी सदाशिव देवडिगिया हे भेरुदाससोबत भिवंडीतील संबंधित पतपेढीत गेले होते. यावेळी पतपेढीचे संचालक श्रीकांत चिट्टपिल्लई यांनी भेरुदास याने त्यांच्या पतपेढीतून 25 नोव्हेंबर 2024 रोजी 357 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर 16 लाख 13 हजार 255 रुपयांचे तर 13 डिसेंबर 2024 रोजी 205 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर 11 लाख 23 हजार 045 रुपये असे 562 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर आतापर्यंत 27 लाख 36 हजार 300 रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती दिली. त्यांच्यावर विश्वास ठेवून सदाशिव यांनी ती माहिती अर्जन सिंघवी यांना दिली. त्यामुळे त्यांनी भेरुदासला 31 लाख 48 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे 31 लाख 50 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते.
मात्र दागिने सोडवून भेरुदास हा त्यांच्याकडे सोन्याचे दागिने विक्रीसाइी घेऊन आला नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर पतपेढीचा संचालक श्रीकांत चिट्टपिल्लई आणि भेरुदास वैष्णव हे दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. या दोघांनी संगनमत करुन सोन्याचे दागिने विक्री करायचे आहे असे सांगून दागिने सोडविण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेऊन या पैशांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच अर्जुन सिंघवी यांनी बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी श्रीकांत चिट्टपिल्लई आणि भेरुदास वैष्णव या दोघांविरुद्ध 31 लाख 50 हजार रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच भेरुदास वैष्णवला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत श्रीकांत चिट्टपिल्लई याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.