एसआरए प्रोजेक्टच्या गुंतवणुकीच्या बहाण्याने पाच कोटीची फसवणुक
शाह हाऊसकॉन प्रायव्हेट कंपनीच्या दोन संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 फेब्रुवारी 2026
मुंबई, – मालाड येथील राणी सती मार्गावरील खोतडोंगरी एसआरए सोसायटीच्या पुर्नविकास प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका व्यावसायिकाची त्यांच्याच परिचित व्यावसायिकाने सुमारे पाच कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शाह हाऊसकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या दोन संचालकाविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मनसुख शाह आणि आकाश मनसुख शाह अशी या दोघांची नावे असून या दोघांनी अशाच प्रकारे बोगस करार करुन इतर काही बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकाची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत मनसुख शाह आणि आकाश शाह यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.
निलेश नरेंद्र राघानी यांचा रियल इस्टेट कंन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असून ते सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात राहतात. त्यांची क्लासिक ट्रिझर प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक खाजगी कंपनी असून याच कंपनीत त्यांच्यासह त्यांचा मित्र जिगर देसाई संचालक म्हणून काम करतात. ही कंपनी एसआरए आणि सोसायटी पुर्नविकास इमारतीचे बांधकाम करते. गेल्या वर्षी मार्च महिन्यांत त्यांचे परिचित जगदीश भानुशाली यांनी त्यांची मनसुख शाह आणि आकाश शाह यांची ओळख करुन दिली होती. त्यांची शाह हाऊसकॉन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी असून ते दोघेही कंपनीत संचालक म्हणून काम करतात. त्यांची कंपनी झोपडपट्टी पुनवर्सनाचे काम करत असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती.
याच दरम्यान त्यांनी त्यांना त्यांच्या मालाड येथील राणी सती मार्गावरील खोतडोंगरी सहकारी सोसायटी या एसआरए प्रोजेक्टची माहिती दिली होती. याच प्रोजेक्टमध्ये मनसुख शाह याने त्यांना गुंतवणुकीचा विनंती केली होती. या प्रोजेक्टमधील 5600 स्क्वेअर मीटर प्लॉटचे बांधकाम ते करणार असून 45 हजार स्क्वेअर फीट सेल एरिया, त्यात 34 हजार स्क्वेअर मीटर सेल एरिया त्यांच्या क्लासिक ट्रिझर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी निलेश राधानी यांची कंपनीत शंभर कोटी आणि 45 हजार स्क्वेअर फीट सेल एरियामधील अकरा स्क्वेअर फिट एरिया शाह हाऊसकॉन प्रायव्हेट लिमिटेड देणार असल्याचे सांगण्यात आले होते. बांधकामाचा संपूर्ण खर्च निलेश राघानी यांची कंपनी करणार तर बांधकामासंर्दीातील परवानगी आणि जागेवरील भाडेकरु यांना तेथून हलविण्याचे काम शाह यांच्या कंपनीकडे सोपविण्यात आले होते.
त्यांचा प्रोजेक्ट चांगला वाटल्याने निलेश राघानी यांनी त्यांच्यासोबत पार्टनरशीपमध्ये एसआर पुर्नविकासामध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांनी दोन्ही कंपन्यांमध्ये एक करार झाला होता. त्यात साक्षीदार म्हणून आकाश शाह आणि जगदीश भानुशाली यांनी स्वाक्षरी केली होती. या करारानंतर त्यांच्या कंपनीत शाह यांच्या शाह हाऊसकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मे ते जुलै 2025 या कालावधीत पाच कोटी पंधरा लाख रुपयांचे पेमेंट केले होते. त्यांच्यात झालेल्या एमओयु आणि पुरक एमओयू कराराप्रमाणे सर्व अटी आणि शर्तीचे पालन करण्यासाठी जबाबदारी मनसुख शाह आणि आकाश शाह यांच्यावर होती. मात्र तीन महिने उलटूनही त्यांनी खोतडोंगरी सहकारी सोसायटीच्या पुर्नविकासासाठी झोपडपट्टी रिकामी करणे, पुर्नविकास प्रोजेक्टचे टायटल क्लिअर नकरणे तसेच त्रयस्थ पक्षांशी समन्वय न साधणे आदी कोणतीही काम केली नव्हती.
हा प्रकार संशयास्पद वाटताच निलेश राघानी यांनी या संपूर्ण प्रोजेक्टची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. त्यात या सोसायटीचे टायटल शाह यांच्याकडे कंपनीकडे नसून त्याची मालकी हक्क एका चॅरिटी संस्थेकडे आहे. प्लॉटवर दाखविलेले झोपडपट्टीधारक तेथून मूळ झोपडपट्टीधारक नव्हते. या प्रोजेक्टमधील काही झोपड्या शाह यांच्या कंपनीने स्थानिक रहिवाशी युसूफ साजिदा याला हाताशी धरुन अतिक्रमण करुन त्यांच्याकडून तीन ते चार हजार रुपये भाडे घेत असल्याचे उघडकीस आले होते. शाह यांच्या कंपनीने झोपडपट्टीधारकांना भाडे दिले नाही म्हणून त्यांनी शाह हाऊसकॉनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात एक खाजगी रिट पिटीशन याचिका दाखल केली होती.
शाह यांच्या कंपनीने त्यांच्यासह इतर विकासकासोबत बोगस करार करुन त्यांच्याकडून सुमारे चौदा कोटी रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली होती. या कराराबाबत त्यांना अंधारात ठेवण्यात आले होते. असे असताना त्यांनी त्यांच्या कंपनीसोबत खोतडोंगरी सोसायटीच्या पुर्नविकासासाठी करार केला होता. पुर्नविकासाच्या कामासाठी त्यांच्या कंपनीकडून पाच कोटी पंधरा लाख रुपये घेऊन त्यांच्यासह त्यांच्या कंपनीची आर्थिक फसवणुक केली होती. त्यांच्याकडे आणखीन 25 कोटीची तसेच आगाऊ दोन कोटी देण्याची मागणी केली होती. त्यांनी पैसे देण्यास नकार देऊन त्यांच्यासोबत करार रद्द केला होता.
तसेच गुंतवणुक केलेल्या पैशांची मागणी केली होती. यावेळी मनसुख आणि आकाश शाह यांनी त्यांनाच प्रोजेक्टवरुन काढून टाकण्यााची तसेच जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर त्यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयात घडलेला प्रकार सांगून या दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस उपायुक्तांनी गंभीर दखल घेत कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर मनसुख शाह आणि आकाश शाह यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.