बोगस कंपनी सुरु करुन पत्नीच्या नावाने काढले 84 लाखांचे कर्ज
तक्रारदार महिलेच्या पतीसह सासर्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 एप्रिल 2026
मुंबई, – बोगस कंपनीत सुरु करुन पत्नीच्या नावाने विविध सात बँकेतून सुमारे 84 लाख रुपयांचे कर्ज काढून फसवणुक केल्याप्रकरणी आरोपी पतीसह सासर्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शमिक हरेश हिराणी आणि हरेश साकलचंद हिराणी अशी या पिता-पूत्रांची नावे आहेत. या दोघांनी तक्रारदार महिलेच्या नावाने बोगस दस्तावेज सादर करुन बँकेतून कर्ज काढून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी या दोघांसह हिराणी कुटुंबियांविरुद्ध पैशांसाठी तक्रारदार महिलेचा मानसिक व शारीरिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हिरेन आणि शमिकविरुद्ध झालेला हा दुसरा गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रिचिता शमिक हिराणी ही 35 वर्षांची तक्रारदार महिला बोरिवली येथे राहते. शमिक हा तिचा पती असून ते विलेपार्ले येथे राहतो. रिचिता आणि शमिक यांचा 4 डिसेंबर 2017 रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर ती तिच्या सासरी गेली होती. ती तिच्या पती शमिक, सासरे हरेश, सासू निता, नणंद रुही आणि मुलगा रिदान यांच्यासोबत राहत होती. शमिक आणि हरेश यांची डीके इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची रियल इस्टेटशी संबंधित एक कंपनी आहे. शमिकला दारुसह ड्रग्ज सेवन करण्याचे व्यसन होते. त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. त्यातून तो तिला मारहाण करत होता.
त्याच्या मोबाईलमध्ये गांजा विक्री करणारे तसेच एस्कॉर्ट सर्व्हिस पुरविणार्या व्यक्तीचे संभाषण तिला दिसले होते. त्यातून तिने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तिला यश आले नाही. नोव्हेंबर 2022 रोजी शमिक आणि हिरेश यांनी तिला व्यवसायात प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना कर्जाची गरज आहे. त्यामुळे त्यांनी तिला कर्ज काढण्यास सांगितले होते. मात्र तिने त्यांना कर्ज काढून देण्यास नकार दिला. डिसेंबर 2022 रोजी तिला तिच्या नावावर 84 लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आल्याचे समजले होते. त्यामुळे तिने तिच्या पती शमिक आणि सासरे हरेश हिराणीकडे विचारणा केली होती. यावेळी त्यांनी तिच्या नावावर वेगवेगळ्या सात बँकांकडून कर्ज काढल्याची कबुली दिली. तिच्या बँक खात्यात जमा झालेली कर्जाची रक्कम त्यांनी परस्पर त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती.
विशेष म्हणजे तिने कुठल्याही बँकेत कर्जासाठी अर्ज केला होता, कुठल्या अर्जावर स्वाक्षरी केली नव्हती. तरीही तिच्या नावाने तिच्या पतीसह सासर्यांनी सात बँकेतून सुमारे 84 लाख रुपयांचे कर्ज काढले होते. रिचिता ही एका खाजगी कंपनीत कामाला होती, तिला 65 हजार रुपये वेतन मिळत होते, कमी वेतन असताना त्यांना तिच्या नावावर 84 लाखांचे कर्ज कसे मिळाले याबाबत विचारणा केली होती, मात्र त्यांनी तिला काहीही माहिती दिली नाही. तसेच तिनेच ते कर्ज भरावे यासाठी तिला धमकी दिली होती. त्यांच्या व्यवसायात त्यांना प्रचंड फायदा होत असताना त्यांनी कर्जाचे हप्ते भरण्यास तिला मदत केली नाही.
एप्रिल 2025 रोजी याच कारणासह कौटुंबिक वादातून तिने तिच्या पतीपासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर ती तिच्या बोरिवलीतील माहेरी निघून आली होती. जुलै 2025 पासून तिने कर्जाचे हप्ते भरणे बंद केले होते. त्यानंतर तिने कर्जाचे हप्ते भरावे यासाठी बँकेकडून तिला कॉल येत होते. त्यामुळे तिने बँकेत जाऊन कर्जाबाबत माहिती घेतली असता तिला शमिक आणि हरेश यांनी तिच्या नावाने रियल्म रिसलेंटर्स नावाची कंपनी सुरु करुन या कंपनीसाठी कर्जासाठी अर्ज केल्याचे दिसून आले. त्यासाठी कर्जाच्या अर्जावर त्यांनी तिची बोगस स्वाक्षरी केली होती.
हा प्रकार लक्षात येताच तिने कस्तुरबा मार्ग पोलिसांत शमिकसह त्याच्या कुटुंबियांविरुद्ध शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर हिरेन, हरेश, निता आणि रुही हिराणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांनंतर आता रुचिताने तिच्या आधारकार्ड, पॅनकार्डचा वापर करुन तिची बोगस स्वाक्षरी करुन तिच्या नावाने बोगस कंपनी सुरु केली, या कंपनीसाठी सुमारे 84 लाख रुपयांचे कर्ज काढून तिची फसवणुक केल्याची तक्रार केली आहे.
या तक्रारीनंतर आता शमिक आणि हरेश यांच्याविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन बँकेतून कर्ज काढून 84 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत पिता-पूत्रांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.