मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 सप्टेंबर 2025
मुंबई, – ब्लॅकमेल करुन एका 63 वर्षांच्या वयोवृद्ध वकिलाकडे दोन तरुणांनी सहा लाखांची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मसाज करतानाचे अश्लील फोटोसह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची भीती दाखवून या दोघांनी त्यांच्याकडून 50 हजाराचा खंडणीचा पहिला हप्ता घेतला असून उर्वरित सहा लाखांची मागणी करुन त्यांना धमकाविले जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी समीर ऊर्फ कन्हैय्या आणि मुन्ना नावाच्या दोन्ही खंडणीखोरांविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
यातील वयोवृद्ध तक्रारदार व्यवसायाने वकिल असून ते दहिसर परिसरात राहतात. काही महिन्यांपूर्वी ते एका मसाज पार्लरमध्ये गेले होते. तिथे त्यांचे मसाज करतानाचे काही अश्लील फोटोसह व्हिडीओ काढण्यात आले होते. ते फोटो आणि व्हिडीओ समीर आणि मुन्ना यांनी तक्रारदार वकिलांना दाखवून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी पैसे दिले नाहीतर त्यांचे अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
इतकेच नव्हे तर पैशांसाठी या दोघांनी त्यांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांच्या मोबाईलवरुन गुगल पे या अॅपद्वारे 50 हजार रुपये घेतले होते. उर्वरित सहा लाखांची व्यवस्था करा नाहीतर तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करुन समाजात त्यांची बदनामीची धमकी दिली होती. 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2025 या कालावधीत त्यांनी अनेकदा खंडणीच्या पैशांसाठी जिवे मारण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तक्रारदार वकिलांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
मंगळवारी घडलेला प्रकार त्यांनी बोरिवली पोलिसांना सांगून समीर ऊर्फ कन्हैय्या व मुन्ना या दोघांविरुद्ध कायदेशीर तक्रार अर्ज केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत या दोन्ही आरोपीविरुद्ध खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.