हत्येच्या गुन्ह्यांतील पळून गेलेल्या चार आरोपींना अटक
स्टेटसवरील गाण्यावरुन पेंटरवर हल्ला केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 एप्रिल 2025
मुंबई, – हत्येच्या गुन्ह्यांतील चार आरोपींना बोरिवली पोलिसांनी अटक केली. चंद्रकांत मच्छिंद्र मराठे, सुरज अजय मास्तर, दिपक शेरसिंग दर्जी आणि मनोजकुमार हरिलाल गौतम अशी या चौघांची नावे आहेत. व्हॉटअपच्या स्टेटवर ठेवलेल्या एका गाण्यावरुन या टोळीने एका पेंटरवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर ते चौघेही पळून गेले होते, मात्र गुन्हा दाखल होताच या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
पेंटर म्हणून काम करणारा रामअचल जिऊत भारती हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून सध्या सांताक्रुज येथे राहतो. त्याच्याच गावचा रहिवाशी असलेला मनोज सांताक्रुज येथे त्याच्या शेजारी राहतो. सहा महिन्यांपूर्वी तो गावी गेला होता. यावेळी त्याने त्याच्या व्हॉटअपच्या स्टेटसवर एक गाण ठेवले होते. या गाण्याला त्याने रितिका असे नाव दिले होते. याच गाण्यावरुन त्याचे मनोजसोबत वाद झाला होता. त्याने स्टेटसवर ठेवलेले गाण काढून टाकावे नाहीतर परिणाम वाईट होतील अशी मनोजने त्याला धमकी दिली होती. त्यामुळे त्याने ते गाण काढून टाकले होते. तरीही त्यांच्यातील हा वाद सुरुच होता.
बुधवारी 9 एप्रिलला रात्री पावणेनऊ वाजता त्याने रामअचलला फोन करुन जिवे मारण्याची धमकी देत त्याला कुठे काम करतो अशी विचारणा केली होती. मात्र त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर तो घरी जाण्यासाठी बोरिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होता. सुधीर फडके ब्रिजजवळून जाताना त्याला एका अज्ञात व्यक्तीने अडविले. काही कळण्यापूर्वीच त्याने त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात रामअचल हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे. हल्ला करणार्या व्यक्तीने त्याचा चेहरा काळ्या रंगाच्या कपड्याने बांधले होते, त्यामुळे त्याची ओळख पटली नव्हती. ही माहिती मिळताच बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी रामअचल भारतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. तपासात मनोजकुमारनेच त्याच्या तीन सहकार्यांच्या मदतीने हा हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर संबंधित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना पळून गेलेल्या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.