घरफोडीच्या गुन्ह्यांतील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक

बोरिवलीतील नऊ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात यश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 ऑगस्ट 2025
मुंबई, – घरफोडीच्या गुन्ह्यांतील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोरिवली पोलिसांनी अटक केली. या दोघांच्या अटकेने बोरिवलीतील नऊ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. अब्दुल हमीद रशीद शेख आणि अब्दुल जमीर पठाण अशी या दोघांची नावे असून ते दोघेही भिवंडी आणि मुंब्राचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध पंधराहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत मोहम्मद कलंदर शेख ऊर्फ माचिस याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

प्रविण गोपीनाथ साळवी हे बोरिवलीतील वझीरनाका, कुलदिप सोसायटीमध्ये राहतात. अंधेरीतील एका खाजगी कंपनीत ते कामाला आहेत. 19 जानेवारीला त्यांची पत्नी पूजा ही तिच्या बहिणीकडे कांदिवलीतील चारकोप येथे गेली होती तर ते साडेसात वाजता इमारतीखाली गेले होते. रात्री पावणेदहा वाजता ते घरी गेले होते. यावेळी त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता त्यांच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश करुन कपाटातील विविध सोन्याचे दागिने आणि कॅश असा सुमारे नऊ लाखांचा मुद्देमालाची चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी बोरिवली पोलिसांना ही माहिती सांगितली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.

सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर या गुन्ह्यांतील आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. ते सतत स्वतचे वास्तव्य बदलत होते. गेल्या आठ महिन्यांपासून पोलीस आरोपींच्या मागावर होते, तरीही पोलिसांनी त्याां शोध सुरु केला होता. याच दरम्यान या गुन्ह्यांतील हैद्राबाद-मुंबई आणि नंतर मुंबई एक्सप्रेस हायवेने ट्रॅव्हेल्समधून मुंबईच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक मिलिंद नागपुरे, पोलीस उपनिरीक्षक राजेश कदम, सहाय्यक फौजदार सावंत, पोलीस हवालदार देसाई, विचारे, पोलीस शिपाई लहांगे, झिरवा, कदम, राणे, महिला पोलीस शिपाई पाटील यांनी खालापूर टोलनाका येथून एका खाजगी बसमधून ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. अटकेनंतर त्यांना शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात अब्दुल शेख आणि अब्दुल पठाण हे दोघेही पूर्वी मानखुर्द आणि गोवंडी परिसरात राहत होते. यावेळी त्यांनी मुंबईतील विविध ठिकाणी पंधराहून अधिक घरफोडी केल्याची कबुली दिली. बोरिवलीतील घरफोडीनंतर ते पळून गेले होते. गेल्या आठ महिन्यांपासून ते पोलिसांना सतत गुंगारा देत होते. त्यांच्या अटकेने घरफोडीच्या अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्याकडून चोरीचे सर्व दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page