मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ एप्रिल २०२४
मुंबई, – करंट खाते उघडण्यास नकार दिला म्हणून एका २३ वर्षांच्या तरुणाचे चारजणांच्या एका टोळीने कारमधून अपहरण केले. मात्र वाहतूक पोलिसांच्या सतर्कमुळे आरोपींचा अपहरणाची योजना फसलीम याप्रकरणी तीन अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली तर त्यांचा मुख्य सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. तुषार निलेश चाकोरकर, दिलखुश बद्रीलालू तेली आणि पवन रामपाल किर अशी या तिघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध अपहरणासह शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोनू संजय सिंग हा २३ वर्षांचा तरुण मूळचा बिहारचा रहिवाशी असून सध्या तो त्याच्या एका मित्रासोबत गोरेगाव येथील बालाजी चाळीत राहतो. त्याची व्ही. आर सर्व्हिस एचआर नावाची प्लेसमेंट कंपनी असून या कंपनीचे कार्यालय गोरेगाव येथील बांगुरनगर मेट्रो स्टेशनजवळ आहे. फेब्रुवारी महिन्यांत त्याच्या कार्यालयात तुषार आणि सौरभ आले होते. या दोघांनाही शेअरमार्केटमध्ये व्यवसाय सुरु करायचा होता. मात्र मुंबईचे रहिवाशी नसल्याने त्यांना बँकेत करंट खाते उघडता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याला त्यांच्यासाठी करंट खाते उघडून देण्याची विनंती करताना त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे त्याने त्यांना त्याच्याच कंपनीच्या नावाने दोन करंट खाते उघडून दिले होते. दोन खाते उघडून दिल्यानंतरही ते दोघेही आणखीन एक करंट खाते उघडून देण्यास त्याला सांगत होता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने त्यांना नकार दिला होता. ६ एप्रिलला तुषारने त्याला प्लेसमेंट कामासाठी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ बोलाविले होते. त्यामुळे तो व त्याचा मित्र विकास हे दोघेही रात्री दहा वाजता तिथे गेला होता. यावेळी सौरभ आणि तुषारने त्याच्याशी करंट खाते उघडून देण्याबाबत वाद घातला. त्याला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांच्यासोबत इतर दोन तरुण होते. काही वेळानंतर या चौघांनी सोनू सिंगला एका कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले होते. हा प्रकार तिथे उपस्थित लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आमच्यात आर्थिक वाद आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या वादात पडू नका अशी धमकी दिली होती. काही वेळानंतर ते चौघेही सोनूला घेऊन दहिसरच्या दिशेने निघून गेले होते.
दहिसर चेकनाका आल्यानंतर सोनूच्या आरडाओरड केल्याने तिथे काही वाहतूक पोलीस आले होते. त्यांनी त्यांची कार अडविण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात सौरभ तेथून पळून गेला तर इतर तिघांना पळून जाताना वाहतूक पोलिसांनी शिताफीने पकडले. ही माहिती नंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांना देण्यात आली. सोनू सिंगच्या जबानीनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध अपहरणासह शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तुषार चाकोरकर, दिलखुश तेली आणि पवन किर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात या टोळीचा म्होरक्या सौरभ असून तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलीस शोध घेत आहेत.