मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जुलै 2025
मुंबई, – ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांतील एका मुख्य आरोपीस बोरिवली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सुहैल जमशेद अली गौर असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 330 ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले आहे. त्याची किंमत 45 लाख 50 हजार रुपये इतकी आहेत. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई शहरात ड्रग्ज तस्कराविरुद्ध स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना काहीजण बोरिवली परिसरात हेरॉईनच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभोये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद निंबाळकर, पोलीस हवालदार रमेश गायकवाड, पोलीस शिपाई रेवाळे, गर्जे यांनी बोरिवलीतील एस. व्ही रोड, शिवमंदिराजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.
शुक्रवारी रात्री उशिरा तिथे सुहेल गौर आला होता. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली होती. त्यात या अधिकार्यांना पंधरा लाख रुपयांचे शंभर ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला दुसर्या दिवशी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीत असताना त्याने त्याच्याकडे आणखीन हेरॉईनचा साठा असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर या पथकाने त्याच्या जोगेश्वरीतील पाटलीपूत्र, ट्रॉन्झिंट कॅम्पमधील राहत्या घरी छापा टाकला होता.
या कारवाईत पोलिसांनी 230 ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले होते. त्याची किंमत 34 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. दोन्ही कारवाईत पोलिसांनी 45 लाख 50 हजार रुपयांचे 330 ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले होते. सुहैलला ते हेरॉईन कोणी दिले, तो हेरॉईन कोणाला देण्यासाठी आला होता. त्याने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.