मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२४
मुंबई, – बलात्काराची धमकी देऊन एका महिलेला अश्लील शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी साबीर अली शेख या आरोपीविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बोरिवलीतील स्थानिक न्यायालय आवारात हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
३३ वर्षांची ही महिला मालाड परिसरात तिचे वयोवृद्ध वडिल आणि भावासोबत राहते. चौदा वर्षांपूर्वी साबीर हा तिच्या शेजारीच राहत होता. त्यामुळे ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. याच दरम्यान त्याने तिला प्रपोज केले होते, तिनेही त्यास होकार दिला होता. जवळपास सहा वर्ष त्यांच्यात प्रेमसंबंध होते. २०१९ साली क्षुल्लक वादातून तिने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. त्यानंतर तो तिला विनाकारण त्रास देऊन तिचा मानसिक शोषण करत होता. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र त्याच्याकडून तिला सतत त्रास दिला जात होता. त्यामुळे तिने २०२१ साली त्याच्याविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केलीद होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी साबीरविरुद्ध ३५४ डी, ५०९, ५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र काही दिवसांनी तो जामिनावर बाहेर आला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने तिचा पुन्हा मानसिक शोषण सुरु केला होता. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ५०९, ५०६ (२) ३४ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा सुनावणीसाठी गुरुवारी ८ ऑगस्टला ती तिच्या वडिलांसोबत बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात आली होती. सुनावणी संपल्यानंतर ती तिचे वडिल आणि वकिलांसोबत न्यायालयाच्या आवारात बोलत होते. यावेळी तिथे साबीर आला आणि त्याने तिला तिच्यावर बलात्काराची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ केली होती. तसेच तिला बघून घेण्याची धमकी दिली होती. हा प्रकार तिचे वडिल आणि वकिलांसमोर घडल्याने त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने घडलेला प्रकार बोरिवली पोलिसांना सांगून साबीरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर साबीरविरुद्ध पोलिसांनी ७९, ३५१ (२) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केल आहे. या गुन्ह्यांत लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.