मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ मार्च २०२४
मुंबई, – पेपर दिला नाही म्हणून विनिता मेमन या महिलेची तिच्याच घरात घुसून चाकूने भोसकून हत्या केल्याचा आरोप असलेल्या राजेश रामजीभाई राठोड या मुख्य आरोपीस दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरवून जन्मठेपेसह दंडाची शिक्षा ठोठाण्यात आली आहे. या हत्येच्या गुन्ह्यांत मृत महिलेची मुलगी आणि शेजारी राहणारी एक महिला मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते, त्यांच्याच साक्षीसह आरोपीविरुद्ध सादर करण्यात आलेल्या सबळ पुराव्या आधारे आरोपीला जन्मेपेची शिक्षा झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.
ही घटना आठ वर्षांपूर्वी म्हणजे २३ जानेवारी २०१६ रोजी बोरिवलीतील एक्सर रोड, निलकमल सोसायटीमध्ये घडली होती. याच सोसायटीमध्ये विनिता ही भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. याच सोसायटीमध्ये राजेश हा राहत असल्याने ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. काही दिवसांपासून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु होता. हा वाद विकोपास गेला होता. २३ जानेवारीला विनिता ही तिच्या घरी होती. यावेळी तिथे राजेश आला आणि त्याने तिच्याकडे पेपर मागितला, मात्र तिने पेपर देण्यास नकार दिला होता. त्याचा राजेशला प्रचंड राग आला होता. याच रागाच्या भरात त्याने तिच्या घरात घुसून तिच्या छातीवर चाकूने वार केले होते. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. रक्तबंबाळ झालेल्या विनिताला स्थानिक रहिवाशांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रक्तस्त्राव जास्त झाल्याने तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हत्येसह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी राजेश राठोडला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी नंतर दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची नियमित सुनावणी न्या. ढोबळे यांच्या न्यायालयात सुरु होती. अलीकडेच या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती.
गुरुवारी २१ मार्च २०२४ रोजी न्या. ढोबळे यांनी राजेश राठोडला हत्येसह जिवे मारण्याच्या गुन्ह्यांत दोषी ठरवून जन्मठेपेसह एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यांत विनिताची मुलगी आणि शेजारी राहणारी रहिवाशी महिला मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यांच्या साक्षीसह पोलिसांनी सादर केलेले सबळ पुराव्याच्या आधारे राजेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारी वकिल म्हणून महाजन यांनी काम पाहिले तर आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक काळे, पैरवी अधिकारी महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माने, कोर्ट कारकून अनंत चित्ते, महिला पोलीस शिपाई कदम, कार्यालयीन पोलीस हवालदार व रायटर हरिश राणे, सावर्डेकर, समन्स वॉरंट बजाविणारे पोलीस हवालदार निजाईन यांनी विशेष परिश्रम घेतले होते. तपास अधिकारी बळीराम जाधव आणि पोलीस निरीक्षक हिंदळेकर यांनी या गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावे सादर करुन कोर्टात आरोपपत्र सादर केले होते. विशेष म्हणजे हत्येनंतर अटक केलेल्या राजेश राठोडला जामिन मिळू नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले होते.