चारित्र्यासह कौटुंबिक वादातून पत्नीची पतीकडून हत्या
हत्येनंतर पतीचे स्वतहून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 डिसेंबर 2025
मुंबई, – चारित्र्यासह कौटुंबिक कारणावरुन सतत होणार्या भांडणातून रागाच्या भरात प्राची ओमराज सरगोत्रा या 48 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना बोरिवलीतील गोराई परिसरात उघडकीस आली आहे. हत्येनंतर पळून न जाता आरोपी पती स्वतहून बोरिवली पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने तिथे उपस्थित पोलिसांना त्याने त्याच्या पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून ओमराज रामचंद्र सरगोत्रा या 47 वर्षांच्या पतीला अटक केली आहे. गुरुवारी त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. बुधवारी सायंकाळी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना बोरिवलीतील गोराई, भीमनगर, गल्ली क्रमांक चारमध्ये घडली. याच परिसरात ओमराज हा त्याची पत्नी प्राची हिच्यासोबत राहत होता. गेल्या काही वर्षांपासून या दोघांमध्ये कौटुंबिक वाद होता. याच वादातून ओमराज हा प्राचीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिचे दुसर्या व्यक्तीशी संबंध असल्याचा त्याला संशय होता. याच कारणावरुन तो तिला सतत शिवीगाळ करुन मारहाण करत होता. त्याच्याकडून तिचा मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता. त्यातून या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी संमतीने घटस्फोट घेण्याचे ठरविले होते. घटस्फोट होईपर्यंत ते दोघेही एकत्र राहत होते.
बुधवारी सायंकाळी त्यांच्यात क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन प्रचंड वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात ओमराजने प्राचीला बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केली होती. नंतर त्याने तिची गळा आवळून हत्या केली होती. ती मृत पावल्याची खात्री होताच तो घरातून निघून गेला. पळून न जाता तो थेट बोरिवली पोलीस ठाण्यात आला. तिथे उपस्थित पोलिसांना त्याने त्याची पत्नी प्राची हिची हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
बेशुद्धावस्थेत असलेल्या प्राचीला पोलिसांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ओमराजने त्याच्या पत्नीची हत्या केल्याची कबुली दिल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत गुरुवारी त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.