दिड वर्षापूर्वी झालेल्या भांडणातून मित्राव कोयत्याने हल्ला
हाऊसकिपिंग कर्मचारी आरोपी मित्राला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 मार्च 2025
मुंबई, – दिड वर्षांपूर्वी झालेल्या भांडणातून मल्लेश नरसया गतप्पा या 29 वर्षांच्या तरुणावर त्याच्याच मित्राने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात मल्लेश हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून हाऊसकिपिंग कर्मचारी असलेला आरोपी मित्र आकाश येशू शिंदे याला अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता बोरिवलीतील मल्हारराव कुलकर्णी मार्ग, लोटस इमारतीच्या आवारात घडली. मल्लेश हा बोरिवलीतील गोराई परिसरात राहतो. आकाश हा त्याचा मित्र असून दिड वर्षांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. त्याचा आकाशच्या मनात राग होता. गुरुवारी सायंकाळी मल्लेश हा त्याचे दोन मित्र रोहित सावंत आणि आकाश कांबळे यांच्यासोबत होळी साजरी करण्यासाठी लोटस इमारतीजवळ आले होते. यावेळी तिथे आकाश शिंदे आला आहे. दिड वर्षांपूर्वी झालेल्या भांडणातून त्याने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. हा वाद सुरु असताना रागाच्या भरात त्याने मल्लेशवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या मानेवर, डाव्या गालावर आणि कपाळावर गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला त्याच्या इतर मित्रांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. हॉस्पिटलमधून ही माहिती प्राप्त होताच बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मल्लेशच्या जबानीवरुन पोलिसांनी आरोपी मित्र आकाश शिंदे याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी मित्राला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यांतील कोयता पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.