45 लाखांच्या चोरीप्रकरणी मोलकरणीसह दोघांना अटक

सतरा लाखांची कॅश हस्तगत करण्यात पोलिसांना यश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 जून 2025
मुंबई, – बोरिवलीतील एका होलसेल व्यापार्‍याच्या घरातून सुमारे 45 लाखांची कॅश चोरी करुन पळून गेलेल्या मोलकरणीला तिच्या सहकार्‍यासोबत गुन्हा दाखल होताच काही तासांत बोरिवली पोलिसांनी अटक केली. अनुराधा राहुल रणदिवे (36) आणि अश्फाक इस्लाम खान (28) अशी या दोघांची नावे असून या दोघांकडून पोलिसांनी सतरा लाखांची कॅश हस्तगत केली आहे. उर्वरित कॅश लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितले. दरम्यान चोरीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

होलसेल व्यापारी असलेले वरुण रमेश वसानी हे बोरिवलीतील आर. एम भट्टाड मार्ग, सिद्धी पॅलेस अपार्टमेंटमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. याच परिसरात त्यांची आर. आर ठक्कर अ‍ॅण्ड कंपनी नावाचे एक शॉप असून ते किराणा सामाची होलसेलमध्ये विक्री करतात. या व्यवसायातून त्यांना दररोज सात ते दहा लाख रुपयांची कॅश प्राप्त होते. ही रक्कम बँकेत जमा करण्यापूर्वी ते घरी घेऊन जातात. त्यानंतर एक-दोन दिवसांनी ही रक्कम बँकेत जमा करतात. त्यांनी त्यांच्या घरी घरकामासाठी अंधेरीतील मरोळ, हायर फॉर केअर प्रायव्हेट कंपनीकडे अर्ज केला होता. या अर्जानंतर कंपनीने त्यांच्या घरी अनुराधा रणदिवे हिला पाठविले होते. अनुराधा ही मूळची पुण्याचया शिरुर, वढू पुर्नवसन गावठाणची रहिवाशी होती. 5 मेपासून तिने त्यांच्या घरी कामाला सुरुवात केली होती.

15 जूनला दुपारी साडेबारा वाजता अनुराधा कोणाला काहीही न सांगता त्यांच्या घरातून निघून गेली होती. त्यामुळे त्यांनी तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. अनुराधा अचानक घरातून निघून गेल्याने त्यांची पत्नी लिपी वसानी हिने बोरिवली पोलीस ठाण्यात तिची मिसिंग तक्रार केली होती. 17 जूनला वरुण वसानी हे कपाटातील कॅश घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना कपाटात कॅश असलेली बॅग सापडली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीकडे विचारणा केली होती. मात्र तिला पैशांबाबत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी सोसायटीच्या सीसीटिव्हीची पाहणी केली होती. यावेळी 15 जूनला दुपारी सव्वाच्या सुमारास त्यांची मोलकरीण अनुराधा रणदिवे ही कॅश असलेली बॅग घेऊन बाहेर जात असल्याचे दिसून आले. या बॅगेत सुमारे 45 लाखांची कॅश होती. ही कॅश अनुराधाने चोरी करुन पलायन केले होते.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार बोरिवली पोलिसांना सांगून तिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अनुराधाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन अनुराधा रणदिवे आणि अश्फाक खान या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी अनुराधाने ही चोरी केल्याची तसेच याकामी तिला अश्फाकने मदत केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीची सुमारे सतरा लाखांची कॅश हस्तगत करण्यात आली आहे. त्यांच्याकडून उर्वरित कॅश लवकरच हस्तगत केली जाणार आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page