बँकेचे अॅप हॅक करुन पोलीस हवालदाराच्या खात्यावर डल्ला
फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दोन सायबर ठगांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 ऑगस्ट 2025
मुंबई, – बँकेचे अॅप हॅक करुन एका पोलीस हवालदाराच्या बँक खात्यातून ऑनलाईन व्यवहार करुन 74 हजार 400 रुपयांवर डल्ला मारणार्या दोन सायबर ठगांना बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. अरुण मनोज राणा आणि भोला मेघलाल राणा अशी या दोघांची नावे आहेत. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.
समाधान रतन जाधव हे वसई येथे राहत असून सध्या बोरिवली पोलीस ठाणत पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. 12 जुलै 2025 रोजी ते दिवसपाळीवर कर्तव्यावर हजर झाले होते. सकाळी पावणेनऊ वाजता ते बोरिवलीतील भाजी मार्केट, अंजता मॉलजवळ असताना त्यांच्या मोबाईलवर बँकेचे दोन मॅसेज आले होते. या मॅसेजच्या पाहणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या बँक खात्यातून 50 हजार आणि 26 हजार 400 रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती, ओटीपी तसेच पासवर्ड कोणालाही शेअर केले नव्हते. तरीही त्यांच्या बँक खात्यातून दोन ऑनलाईन व्यवहार झाले होते.
या व्यवहारातून खात्यातून 76 हजार 400 रुपये डेबीट झाले होते. त्यांनी त्यांच्या बँकेचे अॅप ओपन करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अॅप ओपन झाले नव्हते. त्यांचा मोबाईल हॅक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन ही माहिती सांगितली. यावेळी त्यांना त्यांच्या बँक खात्यात अज्ञात सायबर ठगाने संबंधित ऑनलाईन व्यवहार करुन त्यांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांनी त्यांचे बँक खाते बंद केले होते. अज्ञात व्यक्तीने त्यांचा मोबाईल हॅक करुन ही फसवणुक केल्याने त्यांनी सायबर हेल्पलाईनसह बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमातर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी गंभीर दखल गुन्हे आणि सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अरुण राणा आणि भोला राणा या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनीच समाधान जाधव यांच्या बँकेचे अॅप हॅक करुन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितले.