बंदी असलेल्या गुजरात राज्यात दारुची विक्री

बोरिवली रेल्वे स्थानकातून चारजणांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – गुजरात राज्यात दारु विक्री बंदी असल्याचा फायदा घेऊन जास्त किंमतीत दारु विक्री करणार्‍या एका टोळीचा बोरिवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चारजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी एक लाख अकरा हजार रुपयांचा विविध कंपनीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. गुलामभाई भवसंगबाई राज, साबीर शरीफ शेख, पिंटू विजय गुप्ता आणि दिनेश प्रेमनारायण शुक्ला अशी या चौघांची नावे आहेत. यातील पिंटू हा उत्तरप्रदेश तर इतर तिन्ही आरोपी गुजरातच्या भरुचचे रहिवाशी आहेत. मुंबईतील विविध वाईन शॉपमधून खरेदी केलेली दारु ही ही टोळी गुजरातमध्ये जास्त किंमतीत विक्री करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.

बोरिवली परिसरातील विविध वाईन शॉपमध्ये काहीजण मोठ्या प्रमाणात दारु खरेदी करुन गुजरात भरुच शहरात दारुची अवैधरीत्या विक्री करतात. संपूर्ण गुजरात राज्यात दारुबंदी असल्याने ही टोळी जास्त किंमतीत मुंबईतून खरेदी केलेल्या दारुची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपींविषयी जास्तीत जास्त माहिती काढण्यास सुरुवात केली होती. ही माहिती काढत असताना शनिवारी काहीजण बोरिवली रेल्वे स्थानकात आले असून ते सर्वजण मोठ्या प्रमाणात दारुचा साठा घेऊन गुजरात येथे जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संजय लाड, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद निंबाळकर, पोलीस हवालदार शेख, बाबर, पोलीस शिपाई केसरे, रेवाळे, पवार यांनी बोरिवली रेल्वे स्थानकात साध्या वेशात पाळत ठेवली होती.

यावेळी तिथे आलेल्या गुलामभाई राज, साबीर शेख, पिंटू गुप्ता आणि दिनेश शुक्ला या चौघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना एक लाख अकरा हजार रुपयांचे डीएसपी ब्लॅक लक्झरी विस्कीच्या ३९७, ८ पीएम स्पेशल विस्कीच्या २४०, ऑक्सस्मित विस्कीच्या ३ अशा ६३४ बाटल्या सापडल्या. हा संपूर्ण मुद्देमाल नंतर पोलिसांनी जप्त केला. चारही आरोपीविरुद्ध ६५ (ई), महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेनंतर त्यांना रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. तपासात ही टोळी मुंबईतील विविध वाईन शॉपमधून मोठ्या प्रमाणात दारु खरेदी करुन त्याची जास्त किंमतीत गुजरातच्या भरुचसह इतर शहरात विक्री करत होती. अशा प्रकारे बेकायदेशीर दारु विक्री करणारी ही एक सराईत टोळी आहे. या टोळीने यापूर्वी किती वेळा दारुची तस्करी केली होती, या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा पोलीस तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page