मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पंधरा वर्षांच्या अल्पवयीन नातीवर तिच्याच ७५ वर्षांच्या वयोवृद्ध आजोबांनी लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी आजोबाविरुद्ध दहिसर पोलिसांनी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या सात वर्षांपासून आरोपीकडून पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार सुरु असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. या गुन्ह्यांत आरोपीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून लवकरच त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पिडीत पंधरा वर्षांची मुलगी तिच्या पालकांसोबत बोरिवली परिसरात राहते. तिचे आई-वडिल नोकरीनिमित्त दिवसभर राहत असल्याने तिचा सांभाळ तिचे वयोवृद्ध आजोबा करत होते. आरोपी हा पिडीत मुलीच्या आईचे वडिल असून ते त्यांच्यासोबत राहतात. ही मुलगी नऊ वर्षांची असताना तिचे आजोबा बोरिवलीतील राहत्या घरासह पुण्याच्या कल्याणीनगर, पंजाबच्या मोहोली आणि दिल्लीतील दिलशाद गार्डनजवळ झोपताना अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करत होते. तिच्या संपूर्ण शरीराला नकोसा स्पर्श करुन तिचा लैगिंक अत्याचार करत होते. गेल्या काही महिन्यांपासून ते तिच्या गुप्त भागावर अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार करत होते. २०१७ ते मे २०२४ या कालावधीत आजोबाकडून सुरु असलेल्या या मानसिक व शारीरिक शोषणाला ती कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. ही माहिती ऐकून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. अखेर त्यांनी आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी या मुलीने दहिसर पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्याच वयोवृद्ध आजोबाविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध ३५४ (अ), (१), (आय), ३७६ (२), (एफ), ३७६ (३) भादवी सहकलम ४, ८, १० पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत आरोपी आजोबाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. पंधरा वर्षांच्या नातीवर वयोवृद्ध आजोबाकडून झालेल्या या लैगिंक अत्याचाराच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.