तरुणीवर लैगिंक अत्याचारप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल
आरोपींमध्ये सावत्र पित्यासह दोन पतीसह दोन महिलांचा समावेश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – दोन वर्षांत एका अठरा वर्षांच्या तरुणीवर तिच्याच सावत्र पित्यासह दोन पतीने लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सावत्र पित्यासह दोन्ही पती तसेच पिडीत अल्पवयीन असताना तिचे दोघांशी विवाह लावून दिल्याप्रकरणी तिची आई आणि नातेवाईक महिला अशा पाचजणांविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत पाचही आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर या पाचही आरोपींना दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने सर्वांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिडीत मुलीच्या आईने तिचे ५५ वर्षांसह २५ वर्षांच्या तरुणासोबत लग्न लावून दिले होते. लग्नानंतर तिचे दोन्ही पती तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार करत असल्याचा तक्रारच पिडीत तरुणीने केला आहे. पिडीत तरुणी ही बोरिवली परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिच्या आईने एका आरोपीशी दुसरे लग्न केले असून तो तिचा सावत्र पिता आहे. ती सोळा वर्षांची असताना तिच्यावर तिचा ५० वर्षांचा सावत्र पिता लैगिंक अत्याचार करत होता. तिला जबदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन त्याने तिचा गर्भपात घडवून आणला होता. तसेच तिच्या आईने ५५ आणि २५ वर्षांच्या दोन्ही आरोपीशी तिचा विवाह लावून दिला होता. लग्नानंतर या दोघांनी तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. १ ऑक्टोंबर २०२२ ते १९ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत तिच्यावर संबंधित आरोपींनी लैगिंक अत्याचार करुन तिचा मानसिक व शारीरिक शोषण केले होते. या शारीरिक व मानसिक शोषणाला ती कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने या सर्वांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
शनिवारी तिने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या आईसह सावत्र पिता, दोन्ही पती आणि अन्य एका महिलेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत बोरिवली पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर तिच्या तक्रारीवरुन ७१, ८८, ८९, ३ (५) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ६, ८, १२ पोक्सो सहकलम ९, १०, ११ बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आईसह सावत्र पिता, दोन्ही पती आणि अन्य एक महिला अशा पाचजणांना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिची आई, सावत्र पिता तिच्यासोबत बोरिवली परिसरात राहत असून तिचे दोन्ही पती उत्तरप्रदेश, उत्तराखंड तर नातेवाईक महिला उत्तरप्रदेशची रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.