दिड वर्षांच्या स्वतच्या मुलीला सोडून महिलेचे पलायन

ई-वॉलेटवरुन पळून गेलेल्या महिलेचा शोध घेण्यात यश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सप्टेंबर महिन्यांच्या पहिल्याच स्वतच्या दिड वर्षांच्या मुलीला तिच्याच आईने बोरिवली रेल्वे स्थानकात सोडून पलायन केले होते. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या २० वर्षांच्या महिलेला ई-वॉलेटच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी अटक केली. मुलगी अडचण होऊ लागल्याने तिने तिच्या मुलीला सोडून पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

शबाना (नावात बदल) ही २० वर्षांची महिला मूळची बिहारची रहिवाशी असून तिचा बालविवाह झाला होता. तिला एक दिड वर्षांची मुलगी असून ती सध्या तिच्या मुलीसोबत भाईंदर परिसरात राहत होती. ४ सप्टेंबरला ती मुलीला घेऊन बोरिवली रेल्वे स्थानकात आली होती. काही वेळानंतर ती तिच्या मुलीला तिथेच सोडून पळून गेली होती. ही मुलगी रडत असल्याचे गस्त घालणार्‍या रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे तिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तिच्या पालकांचा पोलिसांनी शोध घेतला, मात्र तिचे पालक पोलिसांना सापडले नाही. त्यामुळे तिला एका आश्रमात ठेवण्यात आले होते. या घटनेनंतर बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी तिच्या पालकांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. एका फुटेजमध्ये पोलिसांना ही मुलगी एका महिलेसोबत दिसली. तीच तिला रेल्वे स्थानकात सोडून पळून गेल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तिचा शोध सुरु केला होता. दुसर्‍या फुटेजमध्ये ही महिला फलाट क्रमांक तीनवरुन दुसर्‍या लोकलने पळून गेली होती. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन अखेर तेरा दिवसांनी पळून गेलेल्या शबानाला भाईंदर येथून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत तिने तीच तिची मुलगी असल्याची कबुली देताना तिने तिला सोडून पलायन केल्याचे सांगितले. ४ सप्टेंबरला शबाना ही कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात आली होती. तेथून ती रिक्षातून खार येथे आली होती. यावेळी रिक्षाचे सातशे रुपये भाडे झाले होते, मात्र तिच्याकडे दोनशे रुपये होते. त्यामुळे तिने रिक्षाचालकाला ई-वॉलेटने भाडे दिले होते. त्यासाठी रिक्षाचालकाने तिचा मोबाईल क्रमांक घेतला होता. याच ई-वॉलेटमुळे रेल्वे पोलिसांना तिची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने भाईंदर येथून शबानाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. बोरिवली रेल्वे स्थानकात स्वतच्या मुलीला सोडून गेल्यानंतर ती भाईंदर रेल्वे स्थानकात आली होती. तिने तिच्या पतीला सोडून दिले असून तिची मुलगी तिच्यासाठी अडचण होती. तिला तिच्यापासून स्वतची सुटका करायची होती. त्यामुळे तिने तिला रेल्वे स्थानकात सोडून पलायन केले होते. तिच्या परिचित लोकांनी मुलीची चौकशी केल्यानंतर तिने मुलीला बिहारला तिच्या आईकडे ठेवल्याची माहिती दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page