आयुष्यात आलेल्या अपयशाला कंटाळून तरुणीची आत्महत्या
इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 सप्टेंबर 2025
मुंबई, – आयुष्यात आलेल्या अपयशामुळे मानसिक नैराश्यातून एका 27 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना बोरिवली परिसरात घडली. पर्ल मिलिंद बागुल असे या तरुणीचे नाव असून तिने निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले आहे. तिच्याकडे कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. पर्लच्या आत्महत्येबाबत तिच्या वडिलांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नाही. त्यांच्या तक्रारीनंतर एमएचबी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
ही घटना मंगळवारी दुपारी बोरिवलीतील गोपीनाथ मुंडे गार्डनसमोरील विनी गार्डन सहकारी सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीमध्ये मिलिंद जयराम बागुल हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. पर्ल ही त्यांची 27 वर्षांची मुलगी आहे. तिला तिच्या आयुष्यात अनेक ठिकाणी अपयश आले होते. सतत येणार्या अपयशामुळे ती काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने मंगळवारी दुपारी तिच्याच निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेतली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती.
ही माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून प्राप्त होताच एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या पर्लला पोलिसांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दुपारी सव्वादोन वाजता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. पर्लकडे पोलिसांकडे कोणतीही सुसायट नोट सापडली नव्हती. त्यामुळे तिच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नव्हता. या घटनेनंतर तिचे वडिल मिलिंद बागुल यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यात त्यांनी पर्ल ही आयुष्यात आलेल्या अपयशाला खचून गेली होती. त्यातून तिला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते.
याच नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता. तिच्या आत्महत्येबाबत त्यांनी कोणाविरुद्ध तक्रार केली नाही किंवा संशय व्यक्त केला नव्हता. त्यामुळे त्यांची जबानी नोंदवून पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. दरम्यान पर्लच्या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.