टिसी कार्यालयाची तोडफोड करुन सरकारी मालमत्तेचे नुकसान
टिसी अधिकार्याशी हुज्जत घालणार्या प्रवाशाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 ऑगस्ट 2025
मुंबई, – सेकंड क्लासच्या तिकिटावर फर्स्ट क्लासच्या डब्ब्यातून प्रवास करताना मिळून आल्याने दंडाची रक्कम भरण्यास सांगितले म्हणून एका प्रवाशाने तिकिट तपासणीशी हुज्जत घालून टिसी कार्यालयातील सुमारे दिड लाख रुपयांच्या शासकीय मालमत्तेची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी बोरिवली रेल्वे स्थानकात घडली. याप्रकरणी आरोपी प्रवाशाविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला पोलिसांनी अटक केली. राहुल सुनिल रसाळ असे या 23 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा धारावीचा रहिवाशी असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताजी खुपेरकर यांनी सांगितले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजता बोरिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दहावरील टिसी कार्यालयात घडली. समशेर इब्राहिम हे विरार येथे राहत असून सध्या पश्चिम रेल्वेमध्ये डेप्युटी सीटीआय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले होते. दुपारी अंधेरी रेल्वे स्थानकातून निघालेल्या लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्यातील प्रवाशांचे तिकिट चेक करत होते. यावेळी राहुल रसाळ नावाचा एक तरुण त्याच्या एक सहकारी पुरुष आणि महिलेसोबत फर्स्ट क्लासमधून प्रवास करत होता, त्यांच्याकडे सेकंड क्लासचे तिकिट होते, त्यामुळे समशेर इब्राहिमने त्यांना दंडाची रक्कम भरण्यास सांगितले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे या तिघांनाही बोरिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दहामध्ये असलेल्या टिसी कार्यालयात आणण्यात आले होते.
यावेळी राहुलने त्यांच्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातील सामानाची तोडफोड करुन सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला होता. टिसी कार्यालयातील सुमारे दिड लाखांच्या सामानाचे नुकसान केल्यानंतर त्याने त्यांना शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली होती. हा प्रकार समजताच बोरिवली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेची वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताजी खुपेरकर यांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर समशेर इब्राहिम यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी प्रवाशी राहुल रसाळविरुद्ध कर्तव्य बजाविणार्या रेल्वे अधिकार्याशी हुज्जत घालून, त्यांना शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण करणे तसेच सुमारे दिड लाख रुपयांच्या शासकीय मालमत्तेचे तोडफोड करुन नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताजी खुपेरकर यांनी सांगितले. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेने टिसी कार्यालयात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.