बाभई स्मशानभूमी उपोषणाचा वाद पोलीस ठाण्यात पोहचला
मनपा अधिकार्यांच्या तक्रारीवरुन सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ जुलै २०२४
मुंबई, – गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आलेले बोरिवलीतील बाभई स्मशानभूमी पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी आर मध्य मनपा कार्यालयाच्या आवारात उपोषणासाठी बसलेल्या सातजणांविरुद्ध बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सातजणांमध्ये डॉ. मीरा सदानंत कामत, सारिका सावंत, विनोद पंडोरे, विजयालक्ष्मी शेट्टी, शितल म्हात्रे, जिगर प्रजापती आणि ऍड. कपिल सोनी यांचा समावेश आहे. मनपा अधिकार्यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरुन हा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
प्रसाद काशिनाथ नाणोसकर हे विरार येथे राहत असून महानगरपालिकेत स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या त्यांची नेमणूक बोरिवलीतील आर-मध्य मनपा कार्यालयात आहे. परिसरातील आरोग्य खात्याशी संबंधित आस्थापना यांचे निरीक्षण करणे, स्मशानभूमी, दवाखाने, आरोग्य केंद्र आदींवर देखरेख ठेवणे अशी त्यांच्या कामाची जबाबदारी आहे. नोव्हेंबर २०२३ साली मनपाच्या वास्तू विशारद खात्याने बोरिवलीतील बाभईनाका, राम मंदिर मार्गावरील बाभई स्मशानभूमी दुरुस्तीच्या कारणावरुन बंद करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर बाभई स्मशानभूमी बंद करण्यात आली होती. ११ जुलैला बेारिवलीतील चिकूवाडी रोड, रुची सहकारी सोसायटीच्या रहिवाशी डॉ. मीरा कामत यांनी बाभई स्मशानभूमी पुन्हा सुरु करण्यासाठी उषोषण करणार असल्याचा एक अर्ज मनपा कार्यालयात दिला होता. उपोषणासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी विनंतीही त्यांनी त्यांच्या अर्जात केली होती. यावेळी मनपाकडून त्यांना एक पत्र पाठविण्यात आले होते. त्यात बाभई स्मशानभूमीचे दुरुस्तीचे काम सुरु असून दुरुस्तीचे काम पूर्ण होताच ते नागरिकांसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे त्यांनी उपोषण करु नये असे सांगून त्यांची विनंती अर्ज अमान्य करण्यात आला होता. तसेच त्यांनी उषोषण करु नये अशी सक्त ताकिदवजा आदेश दिले होते. मात्र या आदेशाला न जुमानता डॉ. मीरा कामत यांनी मंगळवारी २३ जुलैपासून बोरिवलीतील चंद्रावरकर मार्ग, महानगरपालिकेच्या आर-मध्य कार्यालयाच्या आवारात बाभई स्मशानभूमी पुन्हा सुरु करावी यासाठी मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरु केले होते.
या घटनेनंतर प्रसाद नाणोसकर, त्यांचे सहकारी समीर श्रीधर माने यांनी तिथे जाऊन पाहणी केली होती. यावेळी या अधिकार्यांना मिरा कामत यांच्यासह इतर सहाजण तिथे उपोषण करत असल्याचे दिसून आले. यावेळी या अधिकार्यांनी त्यांनी सुरु केलेले उपोषण बेकायदेशीर असून त्यांनी तातडीने उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली होती. तरीही त्यांनी तिथे उपोषण सुरुच ठेवले आहे. त्यांच्या उपोषणामुळे आर-मध्य मनपा कार्यालयात येणार्या नागरिकांना, मनपा कर्मचार्यांना अटकाव, त्रास होण्याचा धोका निर्माण झाला होता. विनंती करुनही त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले नाही. त्यामुळे प्रसाद नाणोसकर यांनी महानगरपालिकेच्या वतीने बोरिवली पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मिरा कामत यांच्यासह त्यांच्या इतर सहाजणांविरुद्ध पोलिसांनी २२३ अ भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे उपोषणाचा हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला आहे.