मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ मार्च २०२४
मुंबई, – मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटात यापूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत नष्ट करण्यात आली होती, यावेळेस असा प्रकार होऊ नये तर आयसीआयसीआय स्टॉक्स विकून अमेरिकेन स्टॉक खरेदी करा अशी धमकीवजा इशारा देऊन अज्ञात व्यक्तीने एक ऑडिओ क्लिपद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेसह मोदी सरकारची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
अभिजीत आनंद पै हे डोबिवलीतील सावरकर रोड, ट्युलिप सोसायटीमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. सध्या ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे उपमहाव्यवस्थापक म्हणून कामाला असून इन्वेस्टर सर्व्हिसेस विभागात त्यांची पोस्टिंग आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक यापूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मोबाईलवर अपलोड केला होता. मात्र ६ मार्चला काही कारणास्तव हा मोबाईल क्रमांक काढण्यात आला. सोमवारी ११ मार्चला दुपारी साडेबारा वाजता ते त्यांच्या कार्यालयात होते. यावेळी त्यांना एका अज्ञात मोबाईलवरुन कॉल आला होता. कॉल रिसीव्ह केल्यानंतर समोरील व्यक्तीचा आवाज येत नव्हता. त्यामुळे त्यांनी तो कॉल बंद केला होता. याच दरम्यान त्यांच्या मोबाईलवर अन्य एक कॉल आला होता. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संभाषण न करता त्यांना एक प्री रेकॉडिंग ऑडिओ क्लीप पाठवली होती. त्यात या व्यक्तीने १२ मार्च १९९३ साली आम्ही बीएसई इमारत पूर्णपणे नष्ट केली होती, यावर्षी आम्ही ती इमारत नष्ट करणार नाही. सावधान, १२ मार्च ते ३० एप्रिल. तुमचे सर्व आयसीआयसीआय स्टॉक्स विकून अमेरिकन स्टॉक्स खरेदी करा. जेणेकरुन मोदी सरकार नष्ट होईल. शिख फॉर जस्टिसचे जनरल वकिल गुरुपतवंत सिंग पन्नून असे ऑडिटमध्ये नमूद केले होते.
सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. एक तासांनी त्यांना पुन्हा एका वेगळ्या मोबाईलवरुन कॉल आला होता. यावेळी त्यांना तीच ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली होती. त्यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील ओजस शहा, दिपक चौधरी, सॅमसन गोन्सेल्वस यांनाही अशाच प्रकारे कॉल करुन ती ऑडिओ क्लिप ऐकविण्यात आली होती. या प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. भारताची अर्थव्यवस्था आणि मोदी सरकारचा नाश करण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्या वतीने तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ५०५ (१), (ब), ५०५ (२), ५०६ (२), ५०७ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.