गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा घालणारा विकासक गजाआड
तक्रारदारासह अनेकांना कोट्यवधींना गंडा घातल्याचा संशय
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 नोव्हेंबर 2025
मुंबई, – पश्चिम उपनगरातील वांद्रे आणि खार परिसरातील वेगवेगळ्या इमारतीच्या बांधकाम प्रोजेक्टमध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीच्या बहाण्याने शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या एका वयोवृद्धाला सुमारे 61 लाखांना गंडा घालणार्या आरोपी विकासकाला खार पोलिसांनी अटक केली. आबिद मजहर हुसैन असे या आरोपी विकासकाचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सुधीर मिश्रा हा सहआरोपी असून या दोघांनी संगनमत करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आहे. तक्रारदारासह इतर तीन ते चारजणांना गुंतवणुकीच्या आमिषाने या दुकलीने कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
65 वर्षांचे एहसान रमजान शेख हे अंधेरीतील रहिवाशी असून ते विदेश संचार निगम लिमिटेडमधून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांना काही रक्कम मिळाली होती. ही रक्कम त्यांना योग्य ठिकाणी गुंतवणुक करायची होती. 2014 रोजी त्यांची सुधीर मिश्राशी ओळख झाली होती. तो रियल इस्टेट व्यवसाय क्षेत्रात कामाला होता. त्याच्यामार्फत त्यांची आबिद हुसैनशी ओळख झाली होती. या ओळखीत सुधीरने आबिद हा विकासक असून त्याची अझिझ रियल्टी बिल्डर अॅण्ड डेव्हलपर नावाची एक कंपनी आहे. या कंपनीचे खार येथे एक कार्यालय आहे. याच दरम्यान या दोघांनी त्यांना वांद्रे येथील वॉटरफिल्टर रोड, त्रिवेदी अपार्टमेंटची जागा दाखवून या जागेचा पुर्नविकास करायचा आहे. या प्रकल्पात त्यांनी गुंतवणुक करावी. 42 लाखांची गुंतवणुक केल्यास त्यांना सहा महिन्यांत 82 लाख रुपये देण्याचे तसेच गॅरंटी म्हणून इमारतीच्या सहाव्या मजल्यावर 1450 स्क्वेअर फुट फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते.
कंपनीच्या लेटरहेडवर आश्वासन देण्यात आल्याने त्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे त्यांनी आबिदच्या इमारत प्रकल्पात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी मे 2015 साली त्यांना 42 लाख रुपये दिले होते. मात्र फेब्रुवारी 2016 पर्यंत त्यांनी गुंतवणुक रक्कमेवर मूळ रक्कमेसह परतावा दिला नाही. याच दरम्यान त्यांनी त्यांना खार येथील एक जागा दाखवून ती जागा त्यांच्या मालकीची आहे. मालमत्तेचे रजिस्ट्रेशन झाले नाही. त्यामुळे तिथे खाजगी विकासक गुंतवणुक करण्यास तयार होत नाही. त्यामुळे त्यांनी त्याला रजिस्ट्रेशनसाठी पंधरा लाखांची मदत करावी असे सांगितले. त्यामोबदल्यात त्याने त्यांना एका महिन्यांत 27 लाख रुपये परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्याला रजिस्ट्रेशनसाठी पंधरा लाख रुपये दिले होते. यावेळी दोन्ही रक्कम व्याजासहीत 1 कोटी 9 लाख रुपये देण्याचे आबिदने मान्य केले होते. याबाबत त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात सुधीर मिश्रा हा साक्षीदार होता.
मात्र एक महिना उलटूनही त्याने त्यांना व्याजाहीत पैसे दिले नाही. त्यामुळे एक महिन्यानंतर त्याने व्याजासहीत मूळ रक्कम परत केली नाही. त्यांचे दोन प्रकल्पाचे काम रखडले असल्याने त्याला आता पैसे देता येत नाही. त्यात त्यांच्या एका इमारतीला बांधकाम परवानगी मिळाली नाही. त्यासाठी त्यांना पाच लाखांची मदत करण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांनी त्यांना आणखीन पाच लाख रुपये दिले होते. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकल्पात गुंतवणुक म्हणून एहसान शेख यांनी आबिद हुसैन आणि सुधीर मिश्रा यांना 61 लाख 50 हजार रुपये दिले होते. मात्र मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम परत न करता त्यांची या दोघांनी फसवणुक केली होती.
चौकशीदरम्यान त्यांना आबिदने अशाच प्रकारे अनेकांकडून गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कोणालाही पैसे परत केले नाही, गॅरंटी म्हणून फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते, मात्र कोणालाही फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यांच्यासह तीन ते चार लोकांची त्यांनी फसवणुक केली होती. ज्या प्रोजेक्टसाठी तो पैशांची मागणी करत होता, मूळात तो प्रकल्प त्याच्या मालकीचा नव्हता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच एहसान शेख यांनी खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आबिद हुसैन आणि सुधीर मिश्रा या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत गेल्या एक वर्षांपासून आबिद हा फरार होता. त्याचा पोलिसाकडून शोध सुरु असताना त्याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने आतापर्यंत किती लोकांची फसवणुक केली आहे, त्यांच्याकडून गुंतवणुकीच्या नावाने किती रुपये घेतले, या पैशांचे त्याने काय केले, कुठे गुंतवणुक केली याचा पोलीस तपास करत आहेत.