मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 एपिल 2025
मुंबई, – दोन दिवसांपूर्वी चेंबूरच्या डायमंड गार्डनजवळ सदरुद्दीन बसर खान ऊर्फ सदरु या बिल्डरवर झालेल्या फायरिंगचा पर्दाफाश करण्यात अखेर गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह शूटरला मिरारोड येथून पोलिसांनी अटक केली. फिरोज बद्दुउद्दीन खान आणि अफसर खान अशी या दोघांची नावे आहेत. यातील फिरोजने प्रॉपटीच्या वादातून सदरुद्दीन यांच्यावर फायरिंग करण्यास सांगितले होते. त्याच्याच सांगण्यावरुन अफसर खानने त्यांच्यावर गोळीबार केला होता. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी चेंबूर पोलिसांकडे सोपविण्यात आले असून शनिवारी दोन्ही आरोपींना हॉलिडे कोर्टात हजर केले जाणार आहे. या वृत्ताला पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दुजोरा दिला आहे.
इरफान अहमद फसीहुल्ला सिद्धीकी हा नवी मुंबईतील बेलापूर येथे राहतो. तो सध्या बिल्डर असलेल्या सदरु यांच्याकडे बॉडीगार्ड म्हणून कामाला आहे. बुधवारी 9 एप्रिलला दिवसभराचे काम संपवून तो सदरु खान यांच्यासह त्यांचा कारचालकासोबत नवी मुंबईतील घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यांची कार चेंबूर येथील डायमंड गार्डनजवळ येताच बाईकवरुन आलेल्या सदरु खान यांच्यावर बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने फायरिंग केले होते. त्यात त्यांच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनंतर चेंबूर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या दोन्ही शूटरचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून संमातर तपास सुरु होता.
ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आमेल माळी, पोलीस उपनिरीक्षक भुजबळ, पोलीस अंमलदार तानाजी पाटील, गणेश काळे, सर्फराज मुलानी, प्रमोद पाटील, रवि वाघमारे व अन्य पोलीस पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम फिरोज खान याला मिरारोड येथील नया नगर परिसरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत फिरोज आणि सदरुद्दीन यांच्यात प्रॉपटीवरुन वाद सुरु होता. याच वादातून फिरोजने अफसरच्या मदतीने सदरु खान यांच्यावर गोळीबार केला. गुन्ह्यांच्या वेळेस फिरोज हा बाईक चालवत होता तर त्याच्या मागे अफसर हा बसला होता. त्यानेच सदरु खान यांच्यावर फायरिंग केले होते. त्यानंतर ते दोघेही पळून गेले होते. फिरोजच्या अटकेनंतर पळून गेलेल्या शूटर अफसर खान याला गुन्हे शाखेच्या अन्य एका पथकाने अटक केली. या दोघांना पुढील चौकशीसाठी चेंबूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.