मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे भायखळा तालुका अध्यक्ष सचिन राममुरत कुर्मी (४६) यांची शुक्रवारी रात्री उशिरा काही अज्ञात मारेकर्यांनी तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही, मात्र हत्येमागे पूर्ववैमस्न कारणीभूत असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मारेकर्यांचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारीही करत आहेत.
ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा साडेबारा वाजता भायखळा येथील घोडपदेव, अनंत गणपत पवार लेन रस्ता, फिरोज फुड्स ऍण्ड फ्लोव्हर दुकानाजवळ घडली. रितेश महेश कुर्मी हा भायखळा येथील प्रभाकर नगरात राहत असून सचिन कुर्मी हे त्याचे काका आहेत. ते सर्वजण एकत्रित राहत असून त्यांचा भायखळा, आंबेवाडी आणि फेरबंदर परिसरात कैची सलून आहे. शुक्रवारी रात्री उशिरा रितेश हा त्याच्या मित्रांसोबत कारमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेला होता. रात्री साडेबारा वाजता त्याला त्याचा नातेवाईक प्रविण लक्ष्मण कुणबीचा कॉल आला होता. त्याने त्याचे काका सचिन कुर्मी यांच्यावर कोणीतरी घातक शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला आहे. ही माहिती समजताच तो त्याच्या मित्रांसोबत तिथे गेला होता. यावेळी तिथे बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीतून तो पुढे गेल्यानंतर त्याला त्याचे काका सचिन कुर्मी हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांच्या डोक्यावर, पोटावर, मानेवर आणि शरीराच्या इतर ठिकाणी तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या जखमा होत्या. त्यामुळे त्याने त्यांना तातडीने जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रितेश कुर्मी याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक तपासात सचिन कुर्मी हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजीत पवार गटाशी संबंधित असून त्यांच्यावर भायखळा तालुका अध्यक्ष पदाची सोपविण्यात आली होती. भायखळ्यातील प्रमुख पदाधिकार्यांमध्ये त्यांचा समावेश होता. परिसरात त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले होते. त्यामुळे त्यांना मानणारा एक वर्ग आहे. त्यांच्या हत्येचे वृत्त समजतााच राष्ट्रवादीसह इतर पार्टीच्या पदाधिकार्यांनी हॉस्पिटल परिसरात प्रचंड गर्दी केली होती. या हत्येमागील कारण समजू शकले नाही. मात्र पूर्ववैमस्नातून त्यांची हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान या हत्येची घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत भायखळा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजवरुन मारेकर्यांची ओळख पटविण्याचे तसेच त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.