मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 ऑगस्ट 2025
मुंबई, – जमिनीच्या वादातून केशव चौधरी ऊर्फ झा या 35 वर्षांच्या व्यक्तीची त्याच्याच मामासह इतर दोन सहकार्यांनी हत्या करुन त्याच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ड्रेनेज गटारात टाकून पलायन केल्याची धक्कादायक घटना माझगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच एका आरोपीस भायखळा तर दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. मृत्यूंजय कामेश्वर झा, गिरीधरलाल झा आणि सन्नी ऊर्फ सन्नीकुमार जयवंत चौधरी अशी या तिघांची नावे असून हत्येनंतर ते तिघेही बिहारला पळून जाण्याच्या तयारीत होते, मात्र या तिघांनाही काही तासांत पोलिसांनी गजाआड केले. हत्येच्या याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी सध्या मंगळवार 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असल्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ घुगे यांनी सांगितले.
गिरीधरलाल हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून माझगाव परिसरात तो सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. केशव हा त्याचा भाचा असून ते दोघेही एकाच गावात राहतात. 22 ऑगस्टला केशव हा त्याचा मामा गिरीधरलाल, त्याचे दोन परिचित सहकारी मृत्यूंजय झा आणि सन्नी चौधरी यांच्यासोबत इमारतीच्या केबीनमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी बसले होते. तिथे केशव आणि गिरीधरलाल यांच्यात जमिनीच्या वादातून भांडण झाले होते. हा वाद इतक्या टोक्याला गेला की या दोघांमध्ये प्रचंड हाणामारी झाली होती. यावेळी रागाच्या भरात त्याने इतर दोघांच्या मदतीने केशवची जड वस्तूने बेदम मारहाण हत्या केली होती. या हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह माझगाव येथील सूर्यकुंड महापुरुष सोसायटीच्या एफ विंगच्या मागील डे्रनेज गटारात टाकून पलायन केले होते.
हत्येच्या चार दिवसांनी हा प्रकार भायखळा पोलिसांना समजला होता. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन केशवचा मृतदेह ताब्यात घेतला होता. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केशवची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. हत्येनंतर मारेकर्यांनी हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या हत्येत गिरीधरलाल झा याचा सहभाग उघडकीस आल्याने त्याच्यासह इतर आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना मृत्यूजंय झा याला शिवडीतून भायखळा पोलिसांनी तर बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या गिरीधरलाल आणि सन्नी या दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी भायखळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. चौकशीत या तिघांनी जमिनीच्या वादातून केशवची हत्या केल्याची कबुली दिली. अटकेनंतर तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.