कर्जासाठी दिलेला फोटो मॉर्फ करुन तरुणीचा बदनामीचा प्रयत्न
भायखळा येथील घटना; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ जुलै २०२४
मुंबई, – एप्रिल महिन्यांत एका खाजगी लोन ऍपवर कर्जासाठी दिलेला फोटो मॉर्फ करुन एका शिक्षिका असलेल्या २५ वर्षांच्या तरुणीचा बदनामीचा प्रयत्न झाल्याची घटना भायखळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भायखळा पोलिसांनी विनयभंगासह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लोन ऍपवर कुठलेही कर्ज घेतले नसताना कर्जाच्या परतफेडीसाठी या व्यक्तीकडून तिला अश्लील संभाषणासह मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठविले जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
तक्रारदार तरुणी ही शिक्षिका असून घोडपदेव परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. ती खाजगी क्लासेस चालवते. एप्रिल २०२४ रोजी तिला पैशांची गरज होती. त्यामुळे तिने तिच्या मोबाईलवरुन गुगल प्ले स्टोरवरुन एक लोन ऍप डाऊनलोड केले होते. कर्जासाठी तिने तिच्यासह तिच्या कुटुंबातील तिघांचे मोबाईल, वैयक्तिक माहिती आणि फोटो अपलोड केला होता. मात्र तिला कर्ज मिळाले नाही. त्यामुळे तिने संबंधित लोन ऍप मोबाईलवरुन डिलीट केले होते. सोमवारी २२ जुलैला ती तिच्या घरी होती. यावेळी तिला वेगवेगळ्या मोबाईलवरुन व्हॉटअपवर मॅसेज येत होते. कर्जाची परतफेड करा नाहीतर तिची बदनामी करण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने दिले होते. तिने कुठल्याही लोन ऍपवरुन कर्ज घेतले नव्हते. तरीही तिला कर्जाच्या परतफेडीनंतर धमकी दिली जात होती. त्यामुळे तिने त्या मॅसेजकडे दुर्लक्ष केले होते. काही वेळानंतर त्याच मोबाईलवरुन तिला अज्ञात व्यक्तीने तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठविले होते. एप्रिल महिन्यांत कर्जासाठी तिने तिचे फोटो पाठविले होते. तेच फोटो मॉर्फ करुन अज्ञात व्यक्तीने तिचे अश्लील फोटो तयार करुन त्याखाली अश्लील संभाषण असलेले मॅसेज पाठविले होते. या व्यक्तीने कर्जाची परतफेड केली नाहीतर तिचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
या प्रकारानंतर तिला धक्काच बसला होता. घडलेला प्रकार तिने तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तिने भायखळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तरुणीने पोलिसांना काही मोबाईल क्रमांक दिले आहेत, या मोबाईलची सीडीआरसह इतर माहिती काढण्याचे काम काढून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.