मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑगस्ट २०२४
मुंबई, – क्लास सुरु असताना एका महिलेच्या घरात प्रवेश केलेल्या व्यक्तीने अचानक नऊ व दहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना भायखळा परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात दोन्ही मुलांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर जे. जे हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. याप्रकरणी लेबन्ता जयराम पटेल या ३० र्षांच्या आरोपीस भायखळा पोलिसांनी अटक केली आहे. लेबन्ता हा आसामचा रहिवाशी असून त्याची मनोरुग्ण असल्याचे बोलले जाते. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने सोमवार २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजता भायखळा येथील घोडपदेव, डी. पी वाडीच्या हेरंब दर्शन इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या रुम क्रमांक तीसमध्ये जयश्री विकास गोरडे ही महिला राहत असून ती खाजगी शिकवणी घेते. शुक्रवारी ती तिच्या घरी खाजगी शिकवणी घेत होती. यावेळी तिथे लेबन्ता आला आणि काही कळण्यापूर्वीच त्याने किचनमधील चाकू घेऊन दहा आणि नऊ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलावर हल्ला केला. त्यात एका मुलाच्या मानेवर आणि दुसर्या मुलाच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर त्याने घरातील सर्व सामानाची नासधूस आणि तोडफोड केली. त्यानंतर त्याने स्वंयपाकघरात प्रवेश करुन गॅसच्या सहाय्याने घराला आग लावण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या गोंधळानंतर स्थानिक रहिवाशांनी तिथे धाव घेऊन लेबन्ता याला ताब्यात घेतले. ही माहिती मिळताच भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही मुलांना जे. जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे प्राथमिक औषधोपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले.
चौकशीदरम्यान त्याचे नाव लेबन्ता पटेल असून तो मूळचा आसामचा रहिवाशी आहे. तीन दिवसांपूर्वीच तो आसामहून मुंबईत आला होता. तेव्हापासून तो छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाजवळील फुटपाथवर राहत होता. त्याच्या अटकेची माहिती त्याच्या आसाममध्ये राहणार्या भावाला देण्यात आली आहे. त्याच्या चौकशीतून त्याची प्रकृती ठिक नसून त्याला अधूनमधून वेड्याचे झटके येत असल्याचे उघडकीस आले आहे. जयश्री गोरडे हिच्या घरात प्रवेश केल्यानंतर त्याला स्थानिक लोक मारतील अशी भीती वाटली, त्यामुळे त्याने हा हल्ला करुन घरातील सामानाची तोडफोड केल्याचे बोलले जाते. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.