घटस्फोट देत नाही म्हणून ३५ वर्षांच्या महिलेवर हल्ला
पतीसह नणंदविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – घटस्फोट देत नाही म्हणून एका ३५ वर्षांच्या महिलेवर तिच्याच पतीसह नणंदने प्राणघातक हल्ला केल्याची घटना भायखळा परिसरात घडली. या हल्ल्यात रिजवाना राशिद अन्सारी ही महिला जखमी झाली असून तिच्यावर जे. जे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. याप्रकरणी रिजवाना हिचा पती राशिद अन्सारी आणि नणंद मेहजबीन अन्सारी या दोघांविरुद्ध आग्रीपाडा पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर ते दोघेही पळून गेल्याने या गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
ही घटना शुक्रवारी ३० जानेवारीला सकाळी अकरा वाजता भायखळा येथील टँक पाखाडी रोड, ट्रॉन्झिंट कॅम्प परिसरात घडली. याच परिसरातील रुम क्रमांक सहामध्ये रिझवाना ही राहत असून राशिद हा तिचा पती तर मेहजबीन नणंद आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात कौटुुंबिक वाद सुरु होता. या वादानंतर त्याला रिझवानाकडून घटस्फोट हवा होता, मात्र तिने त्याला घटस्फोट देण्यास नकार दिला होता. त्यातून त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. शुक्रवारी सकाळी तिथे राशिद आणि मेहजबीन हे दोघेही आले आणि त्यांनी तिला घटस्फोट देण्यास सांगितले, मात्र तिने नेहमीप्रमाणे घटस्फोट देण्यास नकार दिला होता. त्यातून रागाच्या भरात राशिदने तिला हातासह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. हेल्मेटवर आपटून तिला गंभीररीत्या जखमी झाले.
इतकेच नव्हे तर तिचा गळा आवळून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात तिच्या गळ्याला, कानाला, डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर ते दोघेही तेथून पळून गेले होते. जखमी झालेल्या रिझवानाला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. ही माहिती मिळताच आग्रीपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रिझवाना हिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा पती राशिद आणि नणंद मेहजबीन या दोघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.