मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ एप्रिल २०२४
मुंबई, – स्वतसह बहिण आणि आईविषयी आक्षेपार्ह विधानामुळे झालेल्या मानसिक शोषणाला कंटाळून एका २४ वर्षांच्या तरुणीने तिच्या राहत्या घरातील सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भायखळा परिसरात उघडकीस आली आहे. मृत तरुणी ही मुंबई पोलीस दलातील एका पोलीस हवालदाराची मुलगी असून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पराग पंकज डाकी या २६ वर्षांच्या आरोपी तरुणाला भायखळा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर मृत तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
५५ वर्षांचे तक्रारदार त्यांच्या पत्नी आणि दोन मुलीसोबत भायखळा परिसरात राहतात. ते मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असून सध्या ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष शाखेत प्रतिनियुक्तीवर आहे. पराग हा भायखळा येथे राहत असून तो त्यांच्या मेहुणीच्या मुलाच्या पत्नीचा भाऊ आहे. एकाच कुटुंबातील असल्याने ते एकमेकांच्या परिचित होते. मृत तरुणी आणि पराग यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. ते दोघेही नियमित एकमेकांच्या संपर्कात होते. अलीकडेच त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. त्यामुळे रागाच्या भरात तिने त्याचा फोन घेतला होता. त्याचा राग आल्याने त्याने तिच्यासह तिची बहिण आणि आईविषयी अत्यंत घाणेरड्या भाषेत टिका केली होती. त्यांच्याविषयी अपशब्द आणि आक्षेपार्ह विधान करुन तिचा मानसिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने ती प्रचंड मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने सोमवारी १५ एप्रिलला सायंकाळी पावणेपाच वाजता तिच्या राहत्या घरी सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार समजताच भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिला पोलिसांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिथे तिला मृत घोषित करण्यात आले होते. याप्रकरणी तिच्या कुटुंबियांनी जबानी नोंदवून पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी मृत तरुणीचा मोबाईल ताब्यात घेतला होता. त्यात तिचे काही व्हिडीओ पोलिसांना सापडले होते. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या आत्महत्येला पराग डाकी हाच जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. त्याच्याकडून तिच्यासह बहिण आणि आईविषयी काढण्यात आलेल्या अपशब्द आणि आक्षेपार्ह शिवीगाळमुळे ती मानसिक नैराश्यात होती. त्यातून तिने आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. हा प्रकार उघड होताच तिचे पोलीस हवालदार वडिलांनी परागविरुद्ध भायखळा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.