मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 ऑगस्ट 2025
मुंबई, – कॅनरा बँकेच्या सुमारे 117 कोटीच्या कर्ज घोटाळ्यातील वॉण्टेड आरोपीस अटक करण्यात अखेर ईडीला यश आले आहे. अमीत अशोक थेपाडे असे या आरोपीचे नाव असून तो दक्षिण मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये लपला होता, रविवारी हॉटेलच्या रुममध्ये छापा टाकून ईडीने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या संपूर्ण घोटाळतील अमीत हा मुख्य आरोपी असून गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. अटकेनंतर त्याला सोमवारी पीएमएनए कोर्टाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अमीत थेपाडे हा व्यावसायिक असून त्याच्या मालकीची गॅलेक्सी कन्स्ट्रक्टशन अॅड कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मिट्सम इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या दोन कंपन्या आहे. या दोन्ही कंपनीचा तो मुख्य संचालक म्हणून काम पाहत होता. त्याने कॅनरा बँकेतून कर्ज मिळविण्यासाठी त्याच्या कंपन्यासह इतर मालमत्ता गहाण ठेवले होते. ही मालमत्ता गहाण ठेवून त्याला कर्ज मंजूर झाले होते. चौकशीदरम्यान या सर्व मालमत्ता आधीच ठिकाणी विकल्या गेल्या आहेत, ही मालमत्ता गहाण ठेवून इतर अर्थपुरवठा कंपन्याकडून कर्ज घेण्यातआले होते. अशा प्रकारे अमीत थेपाडे याने इतर आरोपींच्या मदतीने कॅनरा बँकेला 117 कोटींना गंडा घातला होता. या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन त्याने बँकेची फसवणुक केली होती.
या संपूर्ण प्रकरणात मोठ्या प्रमाणात मनी लॉड्रिंग झाले होते. त्यामुळे त्याचा सीबीआयसह ईडीने स्वतंत्रपणे तपास सुरु केला होता. तपासात अमीत थेपाडे याने फसवणुकीची रक्कम अनेक ठिकाणी गुंतवणुक केल्याचे तसेच विविध ठिकाणी बेकायदेशीर व्यवहार केल्याचे उघडकीस आले. मनी लॉड्रिंगचा हा प्रकार उघडकीस येताच ईडीने तपास करुन त्याच्या पन्नासहून अधिक बँक खाती गोठविली आहे. साडेनऊ लाखांची कॅश, 2 कोटी 33 लाखांचे सोने, हिर्यांचे दागिने, दोन वहाने आणि आर्थिक व्यवहाराचे महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. तसेच काही डिजीटल उपकरणेही ताब्यात घेण्यात आले होते.
मात्र ही कारवाई सुरु होताच अमीत हा पळून गेला होता. त्याला या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. त्याचा शोध सुरु असताना तो दक्षिण मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती ईडीच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी या हॉटेलच्या रुममध्ये रविवारी छापा टाकून अमीतला अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी पीएमएनए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 29 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.